अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. जिल्हा विभाजन होणे गरजेचे असून, जिल्हा विभाजनासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
ना.तनपुरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवनात सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना ना. तनपुरे यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडला. ना.तनपुरे म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले आहेत.
मंत्रीपद मिळावे, अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मात्र कुणीही नाराज नाही. आम्ही निवडून आलेल्या आमदारांमध्ये चांगला सुसंवाद आहे.
मंत्रीपदाच्या माध्यमातून तिनही पक्षांच्या समान कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे. यामध्ये निळवंडे धरणाचे कालवे, वांबोरी चारी, रस्ते, पाणी योजना आदी रखडलेल्या कामांना गती देण्यात येईल.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्ह्याला तातडीने पोलीस अधीक्षक मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून, लवकर अधीक्षकांची नियुक्ती होईल.
लष्कराच्या के. के. रेंज येथील जमिनीबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी केंद्रीय मंर्त्यांकडे प्रश्न मांडणार असल्याचे तनपुरे म्हणाले.