महाराष्ट्र सरकार अनेक योजना राज्यात राबवत असून खास महिलांसाठीच असणाऱ्या अनेक योजनाही शासनाने आणलेल्या आहेत. यात सध्या लाडकी बहीण योजना राज्यात चर्चेचा विषय झालेली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की राज्य शासनाने महिलांसाठी इतरही अनेक योजना सुरु केल्या आहेत.
उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात व नवा स्टार्टअप उभा करता यावा यासाठी शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप’ योजना आणली आहे. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनींनी स्टार्टअप संकल्पना समोर ठेवून काम करावे हा उद्देश ही योजना सुरु करण्यामागे आहे.
महिला नेतृत्वातील स्टार्टर्स ला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. विशेष मदतीशिवाय किंवा निधी अभावी त्यांचे स्टार्टअप यशस्वी होत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावरच विद्यार्थिनी मधून स्टार्टअपच्या संकल्पना याव्यात
आणि त्या इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून विकसित केल्या जाव्यात. या योजनांना अर्थसाहाय्य मिळाल्यास महिला रोजगार निर्मितीतही वाढ होणे अपेक्षित आहे. स्थानिक गरजांवर आधारित व स्थानिक कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर हे स्टार्टअप विकसित होऊ शकतात. त्यासाठी ही योजना आखली गेली.
कसा घ्यावा लागेल लाभ?
सर्वात आधी तुम्हाला या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा लागणार आहे. ज्या उद्योगांमधून रोजगार निर्मिती होते अशा उद्योगांना अधिक प्राधान्य असेल. स्टार्टअपचे सादरीकरण सत्र आणि मूल्यांकन निकषाद्वारे निवड झाल्यानंतर या स्टार्टअपला अनुदान दिले जाईल.
‘ही’ आहेत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप’ योजनेची वैशिष्ट्ये
– महिला नेतृत्वास पाठबळ व अर्थसाहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून महाराष्ट्राची ओळख देशातील सर्वाधिक महिला स्टार्टपचे राज्य म्हणून व्हावी हा याचा उद्देश आहे.
– या योजनेंतर्गत प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअपला उलाढालीनुसार १ ते २५ लाखापर्यंत आर्थिक साहाय्य दिले जाणार
– स्टार्टअप मधील महिला संस्थापक व सह संस्थापक यांचा किमान ५१ टक्के वाटा स्वतःचा असावा व हे स्टार्टअप एक वर्षापासून कार्यरत असावे
– स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी असावी
– राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदान मिळाले नसावे