अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी कोणता पॅटर्न राबवायचा, हे आज सांगणार नाही. कारण, आज त्याबाबत बोललो तर ज्या गोष्टी करायच्या, त्या कशा होतील?,’ असे भाष्य करत खासदार सुजय विखे यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष निवडीबाबत सस्पेंस कायम ठेवला.
राज्यातील निवडणुकीनंतरची बदलेली परिस्थिती पाहता आता नगरच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व गडाख यांच्या पक्षाचे सदस्य ग्राह्य धरल्यास, त्यांचे संख्याबळ जास्त दिसते आहे. पण राजकारणामध्ये प्रत्यक्ष कागदावर असणारे संख्याबळ व वास्तविकता यामध्ये फरक असतो. त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी ३१ डिसेंबरची वाट पाहा,’ असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
‘राज्यसभेमध्ये आम्ही (भाजप) बहुमत सिद्ध करू शकतो, तर नगरच्या जिल्हा परिषदमध्ये का नाही?,’ असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ३१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेमध्येही महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी, जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न असून त्यासाठी तयारी सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या मोर्चानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
‘राज्यातील निवडणुकीच्या अगोदरची परिस्थिती व निवडणुकीनंतरची बदलेली परिस्थिती फार वेगवेगळी आहे. जिल्हा परिषदेत सदस्य निवडून आले, तेव्हाच्या आघाड्या वेगळ्या होत्या. आता मात्र वेगळ्याच आघाड्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ निश्चितच कागदावर मोठे वाटत आहे. पण आम्ही ज्या पक्षात आहोत, त्याच पक्षाचा अध्यक्ष व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत,’ असे डॉ. विखे यांनी यावेळी बोलताना सांगितले.