Farmer Success Story:- आपण पाहतो की तरुणांनी आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला असून पारंपरिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या पिकांची लागवड व्यावसायिक दृष्टिकोनातून करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन अधिकचा नफा मिळवण्यामध्ये प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांची व फळ पिकांची लागवड करत आहेत. एवढेच नाही तर फळांवर प्रक्रिया करून देखील उद्योग व्यवसायामध्ये जम बसवताना दिसून येत आहेत.

अगदी या मुद्याला धरून जर आपण राजस्थान मधील अभिषेक जैन यांची शेतीची पद्धत पाहिली तर ती शेती तर आहेच परंतु शेती आणि सोबत उद्योग स्वरूपाची आहे. अभिषेक जैन हे सेंद्रिय लिंबू आणि पेरूचे उत्पादन घेतात व 2007 पासून ते शेती करत आहेत. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
अभिषेक जैन यांची उत्कृष्ट शेतीपद्धत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान राज्यातील भीलवाडा जिल्ह्यात असलेल्या संग्रामगड येथील रहिवासी असलेले अभिषेक जैन उत्कृष्ट पद्धतीने शेती करतात व 2007 पासून ते वडिलोपार्जित असलेली शेती करत असून 29 बिघे त्यांच्याकडे जमीन आहे व ते त्यामध्ये सेंद्रिय लिंबू आणि पेरूचे उत्पादन घेतात.
अभिषेकचा शेतीकडे वळण्याचा निर्णय मागील पार्श्वभूमी पाहिली तर अभिषेक हा कॉमर्स शाखेतील पदवीधर असून त्याने सुरुवातीला एका कंपनीची सुरुवात केलेली होती. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे कंपनी बंद करून शेती करणे अभिषेकला क्रमप्राप्त ठरले व त्यांनी शेती करायचे ठरवले.
परंतु आपल्याला माहित आहे की कुठलीही गोष्टीची सुरुवात करताना आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या येतात व त्याच प्रकारच्या समस्या अभिषेकला देखील आल्या. सुरुवातीला पेरू आणि डाळिंबाची लागवड केली. परंतु यामध्ये अपेक्षित नफा मिळाला नाही.
त्यामुळे त्याने यामध्ये बदल करण्याचे ठरवले व इंटरनेटवर बरीच माहिती मिळवली व काही शेतकऱ्यांची व्हाट्सअप ग्रुप जॉईन केले. या सगळ्या माध्यमातून अभिषेक जैन यांना शेतीशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती मिळाली.
अशाप्रकारे वळले लिंबू लागवडीकडे
त्यानंतर सहा एकर जमीन सांभाळण्याचे अभिषेक ने ठरवले व त्याकरिता अनेक बदल अभिषेक यांनी केली. हे बदल करत असताना चार एकर जमीन लिंबू लागवडीकरिता व दीड एकर जमिनीवर पेरू लागवड करायची ठरवले.
तसेच फूड प्रोसेसिंग उद्योग देखील सुरू केला व या माध्यमातून लोणची विकून तो चांगला नफा सध्या मिळवत आहे. अभिषेक यांनी पारंपरिक शेती पद्धत न अवलंबता व्यावसायिक शेती करण्यावर भर दिला. तसेच महत्त्वाचे म्हणजे शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केला व यामुळे अभिषेक यांना खूप मोठा फायदा झाला.
एकीकडे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला व जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली. अभिषेक हे सध्या सहा एकर जमिनीवर फळबागांचे नियोजन करत असून वर्षाला 12 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवत आहेत. अभिषेक यांनी त्यांच्या शेतामध्ये बारमाही उत्पादन मिळेल अशा जातीच्या लिंबांची लागवड केली असून देशी कागदी जातीचा लिंबूची लागवड देखील केलेली आहे.
लिंबाच्या लोणच्याचा बनवला पिकल जंक्शन हा स्वतःचा ब्रँड
अभिषेक हा त्यांच्या शेतातून उत्पादित होणाऱ्या लिंबापासून लोणचे देखील बनवतात.एकदा घरी आलेल्या मित्रांना त्याने बनवलेले लिंबाचे लोणचे खाऊ घातले होते व मित्रांना खूप आवडले. नंतर अभिषेक यांच्या मित्रांनी लिंबाचे लोणचे घरी नेले आणि अभिषेक यांच्या आईला अजून लोणचे बनवायला सांगितले.
त्यानंतर अभिषेकच्या आईने मित्रांकरिता सुमारे 25 ते 30 किलो लोणचे तयार केले. त्यानंतर मित्रांनी अभिषेकला सांगितले की लिंबाचे लोणचे सगळ्यांना खूप आवडले व हे लोणचे बाजारात विकण्याचा त्यांनी सल्ला दिला.
त्यानंतर अभिषेक यांनी या लोणच्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने प्रसार केला व मार्केटिंग केली. संपूर्णपणे या लोणच्याबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली व आज या जोरावर अभिषेक यांनी लिंबाच्या लोणच्याचा स्वतःचा पीकल जंक्शन नावाचा ब्रँड तयार केला आहे.
या ब्रँडच्या माध्यमातून हे लिंबाचे लोणचे ॲमेझॉनवर देखील विकले जाते. अभिषेक यांच्या शेतामध्ये जे काही वर्षाला लिंबाचे उत्पादन होते त्यापैकी 20% लिंबू लोणच्यासाठी वापरला जातो व उरलेला 80 टक्के लिंबाची विक्री बाजारात होते.