Atal Pension Yojana : नोकरीनंतर प्रत्येकाला आपले उर्वरित आयुष्य अगदी आरामात जगायचे असते. पण त्यासाठी तुम्हाला नोकरीच्या काळात गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे. तरच तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात काढू शकता. अशातच सरकारद्वारे देखील अनेक निवृत्ती योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला खूप पैशात गुंतवणूक करता येते. सरकारद्वारे चालवली जाणारी ही योजना विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी डिझाइन केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी या योजनेत एक नवीन नियम जोडण्यात आला होता, त्यानुसार कर भरणारे लोक याचा भाग होऊ शकत नाहीत. अटल पेन्शन योजना 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली आणि 2022 मध्ये करदात्याचा नियम लागू करण्यात आला. या योजनेमध्ये तुम्हाला दरमहा 5000 रुपये मिळतात. यामध्ये तुम्हाला गुंतवणूकही कमी करावी लागते.
किती गुंतवणूक करू शकता?
दरमहा केवळ 210 रुपये गुंतवून तुम्ही 5000 रुपये पेन्शन मिळवू शकता. याचा अर्थ दररोज तुम्हाला फक्त 7 रुपये गुंतवावे लागतील. अटल पेन्शन योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालवली जाते. ही सरकारी योजना असल्याने त्यात पैशांची सुरक्षितता आहे. या योजनेत किमान 1000 रुपये आणि कमाल 5000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे.
कोण गुंतवणूक करू शकतो?
18 ते 40 वयोगटातील लोक यामध्ये पैसे गुंतवू शकतात. योजनेंतर्गत, ग्राहकाला त्याच्या योगदानानुसार, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1,000 ते 5,000 रुपये मासिक पेन्शनची हमी दिली जाते. जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पेन्शनची रक्कम त्याच्या जोडीदाराला दिली जाते.
किती गुंतवणूक करावी लागेल?
अटल पेन्शन योजनेंतर्गत, निवृत्तीनंतर, मासिक पेन्शन 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत असते. जर एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्षे असेल आणि त्याला 60 वर्षानंतर 5000 रुपये पेन्शन हवे असेल तर त्याला दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. तो तीन महिन्यांत 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1239 रुपये अधिक देऊ शकतो. 1,000 रुपये दरमहा पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मासिक 42 रुपये द्यावे लागतील.