आपल्यापैकी बरेच जण अनेक व्यवसायांच्या शोधात असतात. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त आर्थिक परतावा म्हणजेच नफा मिळेल असा व्यवसायाचा शोध बरेच जण घेत असतात. व्यवसायाची निवड करताना प्रामुख्याने त्या व्यवसायाला बाजारपेठेत असलेली मागणी, त्यात करावी लागणारी गुंतवणूक आणि मिळणारा परतावा या बाबींचा विचार करणे खूप गरजेचे असते.
व्यवसायांची निवड करायचे असेल तर भली मोठी यादी तयार होऊ शकते. परंतु स्थानिक बाजारपेठ, आपली आर्थिक कुवत, तुमच्यात व्यवसायाविषयी असलेले सुप्त गुण आणि मार्केटिंगचे ज्ञान इत्यादी बाबी असणे गरजेचे आहे. त्यामुळे यानुसारच व्यवसायाची निवड करावी. याचा अनुषंगाने आपण या लेखात एक चांगला आर्थिक नफा देणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत.
एलोवेरा जेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट
कोरफड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जर आपण कोरफडीचा विचार केला तर कोरफडीपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच सौंदर्य प्रसाधने देखील बनवले जात असल्यामुळे कोरफडीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कॉस्मेटिक उद्योगात आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा वापर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे कोरफडी पासून जेल तयार करण्याचा उद्योग म्हणजेच एलोवेरा जेल मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारून तुम्ही चांगली कमाई करू शकतात.
एलोवेरा जेल हे सन बर्न आणि काही दुखण्यांमध्ये खूप फायदेशीर मानले जाते. तसेच एलोवेरा जेल अन्न उद्योग, सौंदर्यप्रसाधने आणि फार्मा उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कोरफडीचे जेल हे सर्वात खास उत्पादन असून कोरफडीच्या पानांपासून तयार करतात. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी देखील एलोवेरा जेलचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतात. इत्यादी कारणांमुळे त्याची मागणी देखील बाजारात दिवसेंदिवस वाढत आहे.
साधारणपणे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्चाचा विचार केला तर याबाबत खाद्य आणि ग्राम उद्योग आयोगाने एक अहवाल तयार केला असून या अहवालानुसार या प्रकल्पाची किंमत साधारणपणे 24 लाख 83 हजार रुपये इतकी आहे. परंतु एवढ्या मोठ्या गुंतवणुकीला घाबरून जाण्याचे कारण नसून हा व्यवसाय उभा करण्यासाठी तुम्हाला दोन लाख 48 हजार रुपये गुंतवावे लागतील. बाकीचे पैसे तुम्ही कर्जाच्या माध्यमातून उभारू शकतात.
या अहवालाचा विचार केला तर तुम्हाला या व्यवसायासठी एकोणवीस लाख 35 हजार रुपयांचे मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवलासाठी तीन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळू शकते. तसेच जीएसटी नोंदणी, उद्योग आधार नोंदणी, तुम्ही तयार करणार असलेल्या उत्पादनाचे ब्रँड नेम आणि आवश्यक असल्यास ट्रेडमार्क देखील यामध्ये केले जाऊ शकते. मुद्रा योजनेच्या माध्यमातून देखील या व्यवसायाकरिता कर्ज मिळू शकते.
या व्यवसायाच्या माध्यमातून किती कमाई होऊ शकते?
जर आपण वार्षिक कमाईचा विचार केला तर साधारणपणे या व्यवसायातून 13 लाख रुपये सहज कमावता येणे शक्य आहे. आधी सुरुवातीच्या पहिल्या वर्षात चार लाख रुपये नफा या व्यवसायात होऊ शकतो. परंतु त्यानंतर या नफ्यात झपाट्याने वाढ होऊ शकते. तसेच एलोवेरा जेलच्या मागणीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे एलोवेरा जेल निर्मिती व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास आणि बाजारपेठेची माहिती घेऊन हा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच यश मिळू शकते.