Business Success Story:- गेल्या काही वर्षांपासून शेती उद्योग प्रचंड प्रमाणामध्ये संकटात सापडलेला आहे. खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम या दोन्ही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन मिळेल अगदी त्याच वेळेस अवकाळी पाऊस किंवा गारपीट आणि वादळ वाऱ्यांचा तडाखा बसतो व शेती पिके जमीनदोस्त होऊन शेतकरी प्रचंड प्रमाणात आर्थिक संकटात सापडतात.
तसेच बाजारपेठेतील शेतीमालाचे घसरलेले दर त्यामुळे देखील शेतकरी प्रचंड प्रमाणात आर्थिक दृष्टिकोनातून त्रस्त आहेत. या अनुषंगाने शेतीमधून तरायचे असेल तर शेतीला प्रक्रिया उद्योगांची जोड देणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या काही महत्वाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग सुरू करणे ही काळाची गरज आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असलेल्या खाजमापूरवाडी येथील एका तरुणाचा विचार केला तर त्याने केळीपासून चिप्स निर्मिती उद्योग उभारला व अगदी कमी कालावधीमध्ये तो यशस्वी देखील करून दाखवला.
चिप्स उद्योगातून साधली आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुष्काळी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असलेल्या खाजमापुरवाडी येथील उमेश मुके या तरुणाकडे वडिलोपार्जित सुमारे आठ एकर इतकी जमीन आहे.
या परिसरामध्ये व प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यात केळीची लागवड क्षेत्रामध्ये सध्या वाढ झालेली आहे. याच संधीचा फायदा घेत उमेशने साधारणपणे 2018 मध्ये प्रयोग म्हणून केळी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे ठरवले व सुरू देखील केला.
अखंड कष्ट व सातत्याच्या जोरावर त्याने हा उद्योग खूप पुढे नेला व त्याला या माध्यमातून चांगल्या प्रकारचे यश मिळाले. त्यानंतर त्याने त्याच्या आईच्या नावावरून या कंपनीचे नाव ‘अन्नपूर्णा चिप्स’ असे ठेवले. जर आपण आर्थिक दृष्टिकोनातून या कंपनीचे यश पाहिले तर या कंपनीची सध्याची वार्षिक उलाढाल सुमारे 30 लाखापर्यंत आहे.
तसेच उमेश मुकेची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर तो फक्त बारावीपर्यंत शिकलेला आहे. परंतु त्याने त्याच्या कंपनीमध्ये सहा लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
प्रसिद्ध आहे ‘अन्नपूर्णा चिप्स’ ब्रँड
उमेशचा अन्नपूर्णा चिप्स ब्रँड सध्या खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला असून त्याचा या व्यवसायाचा विस्तार हिंगोली जिल्हाच नव्हे तर जवळच्या नांदेड तसेच वाशिम, परभणी, बीड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील झाला आहे. या सगळ्या परिसरामध्ये अन्नपूर्णा चिप्सला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
साधारणपणे त्याच्या कंपनीतून एका वर्षाला 10 ते 12 टन चिप्स विक्री होते व या विक्रीच्या माध्यमातून सध्या अन्नपूर्णा चिप्स ही कंपनी वार्षिक 30 लाख रुपयांची उलाढाल करत आहे. या पुढच्या काळात अन्नपूर्णा चिप्स ब्रँड हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध करण्यावर आणि विस्तारण्यावर भर देणार असल्याचे देखील उमेशने म्हटले.