Business Success Story: एक मिक्सर ग्राइंडर विकत घेऊन केली इडली डोसा व्यवसायाला सुरुवात आज आहे 2000 कोटींची कंपनी? वाचा यशोगाथा

Ajay Patil
Published:
pc mustafa

Business Success Story:- म्हणतात ना कुठल्याही यशस्वी उद्योगाची सुरुवात पाहिली तर ती अगदी अल्पशा प्रमाणात म्हणजेच अगदी छोट्या प्रमाणामध्ये झालेली असते. कालांतराने यामध्ये कष्ट, मेहनत, अभ्यासूपणे केलेले नियोजन आणि हळूहळू बाजारपेठेचा अभ्यास करत केलेले परिस्थितीनुसार बदल इत्यादी गोष्टी या यशामध्ये आपल्याला दिसून येतात.

तसेच कितीही परिस्थिती डगमगली किंवा कितीही व्यवसायामध्ये चढउतार आले तरी देखील मोठ्या धीराने हळूहळू आलेल्या परिस्थितीशी दोन हात करत त्यातून मार्ग काढत व्यवसायामध्ये सातत्य ठेवणे हे देखील तितकेच गरजेचे असते. तेव्हाच कुठेतरी आपल्याला व्यवसायाच्या लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाल्याचे बघायला मिळते.

अगदी याच पद्धतीने आपण जर पीसी मुस्तफा गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या तरुणाचा विचार केला तर ज्याला एक वेळेचे जेवण मिळणे कठीण होते  अशा पीसी मुस्तफा यांनी आज उद्योग जगतामध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. घरची हलाखीची आर्थिक परिस्थिती यशामध्ये येत नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. या लेखात पीसी मुस्तफा यांची अनोखी यशोगाथा आपण बघणार आहोत.

एक मिक्सर ग्राइंडर घेऊन केली व्यवसायाला सुरुवात

पीसी मुस्तफा यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला व घरची आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची होती की एका वेळच्या जेवणाची त्यांना समस्या होती. परंतु तरी देखील कठीण प्रसंगांना तोंड देत आणि परिस्थितीशी दोन हात करत आपण काहीतरी करावे या इच्छेने त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण देखील त्यांना घेता आले नाही. परंतु तरीदेखील संकटांवर मात करत शिक्षण पूर्ण केले व एका कंपनीमध्ये नोकरी पत्करली. परंतु मनामध्ये काहीतरी वेगळेच करून दाखवण्याची इच्छा असल्यामुळे त्यांना नोकरीमध्ये अजिबात मन लागत नव्हते.

त्यामुळे त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले व इडली डोशाची विक्री करावी हा विचार त्यांच्या मनात आला व लागलीच त्यांनी एक मिक्सर ग्राइंडर आणि सेकंड हॅन्ड बाईकच्या मदतीने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आज त्यांच्या या व्यवसायाचे रूपांतर पाहिले तर मोठ्या कंपनीमध्ये झाले असून पीसी मुस्तफा यांनी फ्रेश फूड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे मालक आहेत.

 अशा पद्धतीने वाढवला व्यवसाय

या अगोदर ते दुबई सिटी बँकेमध्ये नोकरीला होते. परंतु काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनाशी असल्यामुळे व स्वतःचा व्यवसाय करावा ही इच्छा असल्याने ते भारतात परतले व एका दिवसाला शंभर पॅकेट विक्री करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. जसे जसे ग्राहक वाढू लागले तसे तसे मुस्तफा यांनी व्यवसायाचा विस्तार केला व त्यासाठी जमीन देखील खरेदी करून त्या जमिनीवर कंपनीची सुरुवात केली.

त्यानंतर उत्पादनाची मागणी वाढल्यामुळे अगोदर दिवसाला शंभर फूड पॅकेट्स विकणाऱ्या मुस्तफा यांची कंपनीची विक्री दिवसाला दोन हजार इतक्या फूड पॅकेट पर्यंत पोहोचली. आता त्यांची कंपनी नुसताच इडली डोसा विकत नसून त्यासोबत मालाबार पराठा आणि चपाती या खाद्यपदार्थांचे देखील विक्री करते.

 आज आहे कंपनीचा दोन हजार कोटींचा टर्नओव्हर

प्रचंड प्रमाणात कष्ट आणि सातत्य यांच्या जोरावर पीसी मुस्तफा त्यांच्या कंपनीने आज गगन भरारी घेतली आहे. कष्टाच्या जोरावर पीसी मुस्तफा यांच्या कंपनीचे उत्पादन बऱ्याच ठिकाणी पोहोचली असून हेलियन व्हेंचर्स या विदेशी कंपनीने पीसी मुस्तफा यांच्या फ्रेश फूड इंडियावर विश्वास ठेवला व पस्तीस कोटींची गुंतवणूक केली

व तेथून खरी कंपनीची यशाकडे वेगात वाटचाल सुरू झाली. यावर्षी त्यांच्या कंपनीने 500 कोटींचा टर्नओव्हर नोंदवला व आज या कंपनीचे व्हॅल्युएशन जवळपास दोन हजार कोटींपर्यंत असून एवढ्या मोठ्या कंपनीचे पीसी मुस्तफा कष्टाच्या जोरावर मालक बनले आहेत.

यावरून आपल्याला दिसून येते की जर कष्ट करण्याची ताकद असेल तर व्यक्ती कुठलीही गोष्ट सहज साध्य करू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe