Business Success Story:- घरामध्ये मुलीचा जन्म होणे म्हणजेच घरात लक्ष्मीचे पाऊल पडणे असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये समजले जाते. अशा या मुली आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांच्या बरोबरीने किंबहुना काही अंशी त्यांच्यापुढे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच उच्चशिक्षणामध्ये देखील अनेक मुली आज खूपपुढे असून अनेक परीक्षांच्या टॉपर्सच्या यादीमध्ये आज मुलींचा गाजावाजा आपल्याला दिसून येतो.
याच पद्धतीने आपण शहाजहांपूर रोजा या भागामध्ये राहणाऱ्या ऋचा दीक्षितचे उदाहरण बघणार आहोत. या मुलीने कृषी मध्ये बीएससी पूर्ण केली आणि त्यानंतर एमबीए पूर्ण करून एका कृषी क्षेत्रातील प्रसिद्ध आणि नामांकित कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली व नंतर नोकरी सोडून तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला व आज ती कोटीमध्ये पैसे कमावत आहे.
एमबीए पास असलेल्या मुलीने सुरू केला वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत बनवण्याचा व्यवसाय
याबाबत सविस्तर वृत्त असे की शाहजहांपूर रोजा या भागामध्ये राहणाऱ्या ऋचा दीक्षित या मुलीने कृषी क्षेत्रामध्ये बीएससी पूर्ण करून नंतर एमबीए केले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिने कृषी क्षेत्रातील एका प्रसिद्ध कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. परंतु मनामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करावा हे सुरू असल्यामुळे नोकरीत मन रमत नव्हते आणि त्यासोबतच कंपनीच्या माध्यमातून मिळणारा पगार हा अपूर्ण पडत होता.
म्हणून 2021 मध्ये ऋचा दीक्षितने गांडूळ खत बनवायला सुरुवात केली आणि हे तयार गांडूळ खत नर्सरी आणि शेतकऱ्यांना विकायला तिने सुरुवात केली. तयार केलेल्या या गांडूळ खताची विक्री वाढावी याकरता तिने ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याचे ठरवले व गांडूळ खताची विक्री तीने ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुरू केली.
यामध्ये तिने स्वतःचा ब्रँड तयार केला व या ब्रँडची नोंदणी करून या ब्रँडच्या माध्यमातून कोकोपीट तसेच वर्मी कंपोस्ट इत्यादी तिने विकायला सुरुवात केली. ऋचाने तिच्या घराच्या थोड्या अंतरावर वर्मी कंपोस्टचे युनिट उभारले आहे व तिथूनच ती सगळ्या तयार गांडूळ खताचे पॅकिंग करते व शिपिंग साठी देखील पाठवते.
दिवसाला मिळता चारशे ते पाचशे ऑर्डर्स
ऋचा दीक्षितच्या गांडूळ खत युनिटमधून ज्या गांडूळ खताची निर्मिती होते त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खूप मागणी आहे व दररोज 400 ते 500 ऑर्डर्स मिळत आहेत. परंतु कधी कधी या मिळणाऱ्या ऑर्डर्स मध्ये प्रचंड वाढ होऊन 5000 ते 7000 पर्यंत पोहोचते. तीने एक दुकान देखील उभारले आहे व काही लोक त्या ठिकाणी येऊन थेट खरेदी देखील करतात.
एवढेच नाही तर तिने आज या व्यवसायामध्ये जवळपास सहा सात लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे व त्या लोकांना आज दिवसाला पाचशे ते सातशे रुपये कमाई करण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे.
ऋचा दीक्षित व्यवस्थित नियोजन करून तिचा व्यवसायामध्ये वेगाने वाढ करत आहे व गेल्या वर्षी तिची उलाढाल वार्षिक 50 लाख रुपयांपर्यंत होती तर यावेळेस तिला वर्षाच्या अखेरीस अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.