कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याचा परिणाम अनेक उद्योग, व्यवसायांवर झाला. हे व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण आखले आहे.
तसेच आता खाद्यपदार्थ घरपोच देणारी सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्विगीने ११०० कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतीच झोमॅटोने १३ टक्के कर्मचारीकपात केली होती. त्यानंतर स्विगीने हे पाऊल उचलले आहे. स्विगीतर्फे सोमवारी याविषयीची घोषणा करण्यात आली.
करोनामुळे निर्माण परिस्थितीचा स्विगीच्या मुख्य व्यवसायावर तसेच त्याच्या क्लाऊड किचन व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.
स्विगीचे संस्थापक व सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी सांगितले की, आज स्विगीसाठी सर्वात दुःखाचा दिवस आहे. नाईलाजाने कंपनीला आपला आकार कमी करावा लागत आहे.
याची माहिती देणारे ईमेल कर्मचाऱ्यांना स्विगीने पाठवले आहेत, असे कंपनीने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. स्विगीने आपल्या किचन सेवा यापूर्वीच बंद करण्यास सुरुवात केली आहे.
या सेवा तात्पुरत्या किंवा कायमच्या बंद करण्याचा कंपनीचा विचार आहे. कामावरून कमी करण्यात येणारे ११०० कर्मचारी हे विविध स्तरांतील आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कपात केल्या जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना स्विगीतर्फे किमान तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. याशिवाय त्यांनी जितकी वर्षे या कंपनीत काम केले आहे त्या प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचे वेतन दिले जाणार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.