तुमचे शिक्षण किती झाले आहे किंवा तुमच्याजवळ किती पैसा आहे? या गोष्टी तुमच्या यशासाठी महत्त्वाच्या नसतात. महत्वाचे असते ते की तुमच्याकडे एखादी गोष्ट करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, प्रयत्न करण्याची तयारी, ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी कुठलीही किंमत चुकवण्याची क्षमता आणि प्रयत्नांमध्ये सातत्य हे होय.
या सगळ्या गुणांची गोळाबेरीज जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नेहमी काहीतरी शिकण्याची धडपड आणि त्यातून काहीतरी नवनिर्मिती करण्याची संकल्पना मनाशी असणे खूप गरजेचे असते.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बीडच्या दादासाहेब भगत या तरुणाची यशोगाथा पाहिली तर दहावी उत्तीर्ण असलेल्या दादासाहेबने एकेकाळी घरच्या उदरनिर्वाह करिता इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये ऑफिसबॉय म्हणून महिन्याला नऊ हजार रुपये पगारावर काम केले.
परंतु काहीतरी वेगळे करण्याच्या उद्दिष्टाने प्रयत्न केले व मनात जिद्द ठेवून स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. आज याच गुणांच्या जोरावर दादासाहेबने स्वतःची कंपनी उभी केली असून त्या माध्यमातून ते कोट्यावधी रुपयांचा टर्नओव्हर करत आहेत.
गाईचे गोठ्यापासून सुरू झालेल्या कंपनीचा प्रवास पोहोचला कोट्यावधी रुपयापर्यंत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दादासाहेब भगत हा तरुण बीडचा असून त्याने एकेकाळी इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम केले. परंतु काहीतरी वेगळे करावे ही जिद्द मनात असल्यामुळे त्या दिशेने देखील प्रयत्न सुरू ठेवले.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज दादासाहेब भगत दोन कंपन्यांचे मालक असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये देखील दादासाहेबाचे कौतुक केले होते. शिक्षणामध्ये दहावी उत्तीर्ण असून या शिक्षणाच्या बळावर इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम दादासाहेबला मिळाले व आज त्यांनी मेहनतीच्या जोरावर स्वतःची कंपनी सुरू केली.
साधारणपणे 1994 मध्ये जन्म झालेल्या दादासाहेब भगत यांने दहावीनंतर आयटीआय पूर्ण केले व इन्फोसिसच्या गेस्ट हाऊस मध्ये रूम सर्विस बॉय म्हणून नोकरी पत्करली. या कामाकरिता त्याला महिन्याला नऊ हजार रुपये पगार मिळत होता.
इन्फोसिस ही सॉफ्टवेअर कंपनी असल्यामुळे दादासाहेबला सॉफ्टवेअरचे महत्व काय असते हे कळाले. त्यानंतर यामध्ये शिक्षण घ्यायचे त्यांनी ठरवले. ऑफिस बॉयचे काम करत असताना दादासाहेब यांनी ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशनचा अभ्यास केला.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुंबईमध्ये नोकरी मिळवली व त्यानंतर तो हैदराबादला गेला व तिकडे नोकरी सोबतच C++ आणि पायथॉन चा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याचा गुण अंगी असल्यामुळे यामध्ये तो सातत्याने यशस्वी होत केला.
जेव्हा दादासाहेब डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनी सोबत काम करत होता तेव्हा पुन्हा वापरता येतील अशा डिझाईन आणि टेम्प्लेटच्या लायब्ररीवर काम करणे हा एक उत्तम पर्याय असल्याचे त्याला समजले व इथूनच त्याने स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्याचा निश्चय घेतला व ते सुरू केले.
त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याने डिझाईन टेम्पलेटची विक्री सुरू केली व हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर एक दुर्दैवी अपघात दादासाहेबचा घडला व त्यामुळे अनेक महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले.
मात्र या कालावधीमध्ये त्याने स्टार्टअपची संपूर्ण दिशा निश्चित केली व 2015 मध्ये पहिली कंपनी Ninthmotion सुरू केली व अल्पावधीमध्ये या कंपनीचे 6000 ग्राहक जोडले गेले.
त्यानंतर सुरू केले ग्राफिक डिझायनिंगचे काम
त्यानंतर न थांबता त्याने ऑनलाईन ग्राफिक डिझाईनचे काम सुरू केले व या ग्राफिक्स डिझाईन करिता नवीन सॉफ्टवेअर विकसित केले. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत लॉकडाऊन लागल्यामुळे दादासाहेब गावी परत आला व गावातील गोठ्यामध्ये त्याने तात्पुरते ऑफिस सुरू केले.
तीन मित्रांना ॲनिमेशन आणि डिझाईनचे काम त्याने शिकवले व कंपनीमध्ये नोकरी देखील दिली. याबाबतीत प्रयत्न करत असताना 2020 मध्ये ग्राफिक
डिझाईनिंग सॉफ्टवेअर तयार केले आणि त्याची दुसरी कंपनी DooGraphics सुरू केली. कधीकाळी इन्फोसिस मध्ये 9000 पगारावर ऑफिसवरचे काम करणारा दादासाहेब आज कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे.
दादासाहेबने शार्क टॅंक मधून कंपनीसाठी मिळवली एक कोटींची गुंतवणूक
दादासाहेब भगत नुकताच शार्क टॅंकच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झाला होता व त्याच्या कंपनीची व्हॅल्युएशन आता दहा कोटी रुपये झाली आहे.
शार्क टॅंकच्या माध्यमातून दादासाहेबने 2.5% इक्विटी च्या मोबदल्यात एक कोटींची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत बोटचे को फाउंडर अमन गुप्ता यांनी दादासाहेबांच्या कंपनीतील दहा टक्क्यांच्या मोबदल्यात एक कोटीची रक्कम दिली व दोघांमधील डील पक्की झाली.
अशा पद्धतीने जर मनामध्ये जिद्द असेल व ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी व प्रयत्नांमधील सातत्य हे गुण असतील तर व्यक्ती अगदी शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दादासाहेब याच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.