Financial Rules : सप्टेंबर महिना संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून नवीन महिन्याला सुरुवात होत आहे. नवीन महिन्यासोबत अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट सामान्यांवर परिणाम होणार आहे. सामान्य लोकांना त्यांचे पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक बचतीशी संबंधित अनेक कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत, जेणेकरून, 1 ऑक्टोबरला कोणताही पश्चात्ताप होणार नाही.
तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपूर्वी बदलून घ्यायच्या आहेत. तसेच बचत योजनांमध्ये आधार अपडेट करणे आवश्यक आहे अन्यथा खाते गोठवले जातील. चला तर मग जाणून घेऊया पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत, आणि तुमच्यावर त्याचा कसा परिणाम होईल.

आधार कार्ड अपडेट
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेला भेट द्यावी लागेल आणि आधारशी संबंधित माहिती द्यावी लागेल. तुम्ही असे न केल्यास तुमचे बचत योजना खाते १ ऑक्टोबर रोजी गोठवले जाऊ शकते. अशातच सरकारने याबाबत अद्याप तारीख वाढवलेली नाही.
स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम
SBI ची WeCare स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम 30 सप्टेंबर रोजी संपत आहे, SBI द्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना चालवली जात आहे. या योजनेत केवळ ज्येष्ठ नागरिकच सहभागी होऊ शकतात. मात्र यात गुंतवणूक करण्यासाठी फक्त आठच दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये त्यांना FD वर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे जे सामान्य लोकांपेक्षा 100 बेसिस पॉइंट्स जास्त आहे. या योजनेची तारीख वाढवण्याबाबत बँकेने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
IDBI अमृत महोत्सव FD
आयडीबीआय बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची मुदतही ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. अमृत महोत्सव एफडी योजनेअंतर्गत बँक ३७५ दिवसांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज दिले जात आहे. तसेच, या योजनेंतर्गत 444 दिवसांच्या FD साठी सर्वसामान्यांना 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज दिले जात आहे.
2000 रुपयांची नोट
आरबीआयने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. सर्व सामान्य लोकांना या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा किंवा बदलून देण्याची सुविधा देण्यात आली आहे. तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट पडून असल्यास तुम्ही ती बँकेत जमा करू शकता किंवा 30 सप्टेंबरपर्यंत बदलून घेऊ शकता.
डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नॉमिनेशन
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. त्याची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. जर तुम्हाला तुमचे डिमॅट खाते सक्रिय ठेवायचे असेल तर हे काम वेळेत पूर्ण करा.
म्युच्युअल फंडात नॉमिनेशन
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नॉमिनेशनआवश्यक आहे. त्यासाठी SEBI ने 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. तुमचे खाते गोठवले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी, तुम्ही नॉमिनेशन प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.