Ginger Farming:- शेतीमध्ये जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्ही कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात याची अनेक उदाहरणे आपल्याला सध्या दिसून येत आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण खूप पुढे असून शेतीमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून ज्या तरुणांनी आता पाऊल ठेवले आहे ते शेतीमध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असून भरघोस उत्पादन मिळवण्यात देखील यशस्वी होत आहेत.
कारण सध्या नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अनेक तरुण घरच्या शेतीकडे वळत असून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्तम अशी शेती करत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमठाणा या गावातील काशिनाथ सोमासे व विकास मोरे या तरुणांची यशोगाथा पाहिली तर त्यांनी देखील नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीचा ध्यास घेत आल्याची लागवड केली व 34 गुंठ्यामध्ये तब्बल 185 क्विंटल आल्याचे उत्पादन मिळवले. त्यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

34 गुंठ्यांमध्ये आल्याचे घेतले 185 क्विंटल उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काशिनाथ सोमासे व विकास मोरे या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीला आधुनिकतेची जोड देत आल्याची लागवड केली व 34 गुंठा आले लागवडीतून त्यांनी तब्बल 185 क्विंटल आल्याचे उत्पादन मिळवून तब्बल 14 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.
आमठाणा गावचे काशिनाथ सोमासे व विकास मोरे हे दोन्ही तरुण शेतकरी असून ते अल्पभूधारक आहेत. आहे त्या शेतीमध्ये त्यांनी आल्याची लागवड करण्याचे ठरवले व मे महिन्यात एक एकर शेतामध्ये अद्रक पिकाची लागवड केली होती. या एका एकर क्षेत्रामध्ये त्यांना जवळपास एक लाख रुपये खर्च आला.
आले पिकाचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना ऍग्रो कंपनीचे बहुमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. तसेच उत्तम पाणी व्यवस्थापन आणि गायके ब्रदर्स यांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे त्यांना आल्याचे भरघोस उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या दोघा तरुणांनी फक्त सातच महिन्यात साडेसात लाखांचे उत्पन्न मिळवून एक मोठा विक्रमच प्रस्थापित केला.
या दोघांना मिळून 14 लाखांचे उत्पादन झाले. त्यामध्ये काशिनाथ सोमासे या तरुणाने 34 गुंठ्यामध्ये आल्याचे विक्रमी असे उत्पादन मिळवले व दहा वर्षापासून सोमासे आल्याची लागवड करत आहे. परंतु प्रत्येक वर्षी एका एकराला एक लाख रुपये खर्च येत होता परंतु आता एकरी खर्च दहा हजारांच्या आत आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
मागील एक वर्षापासून आल्याला चांगला बाजार भाव मिळत असून मागणी चांगली आहे. त्यामुळे आल्याचे बाजार भाव टिकून राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे लक्ष देऊन भरघोस उत्पादन घ्यावे.
अजून देखील दोन वर्ष आल्याला चांगला बाजार भाव राहील असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी देखील व्यक्त केलेला आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अंदाज घेऊन जर जास्तीत जास्त आल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली तर नक्कीच चांगला पैसा हातात येऊ शकतो.