सोने-चांदीच्या बाजारात मोठी उलथापालथ; ऐतिहासिक घसरणीनंतर गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता

Published on -

Gold Rate : गेल्या काही आठवड्यांपासून गगनाला भिडलेले सोने-चांदीचे दर अचानक कोसळल्याने देश-विदेशातील बाजारात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. ३०) चांदीने गेल्या ४५ वर्षांतील सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण नोंदवत तब्बल २७ टक्क्यांची आपटी घेतली, तर सोन्याने १९८३ नंतरचा सर्वांत वाईट दिवस पाहिला. या घसरणीमुळे “सोने-चांदीचा बुडबुडा फुटतोय का?” असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे.

एका दिवसातच चांदीचा भाव चार लाख रुपयांच्या उच्चांकावरून सुमारे १ लाख २८ हजार रुपयांनी खाली आला. सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली असून १ फेब्रुवारी रोजीही हे दर दबावाखालीच राहिले.

याचा थेट परिणाम सोने-चांदी ईटीएफवर झाला असून त्यामध्ये ९ ते १४ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात चांदीच्या भावात तब्बल ५६ टक्क्यांची वाढ झाली होती, त्यामुळे ही दुरुस्ती (करेक्शन) अपेक्षित मानली जात आहे.

या घसरणीमागे अनेक कारणे पुढे येत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा मोठा ग्राहक असलेल्या चीनमध्ये मागणी घटल्याच्या बातम्यांमुळे बाजारात भीतीचे वातावरण पसरले. तसेच भाव विक्रमी पातळीवर पोहोचल्याने बड्या गुंतवणूकदारांनी नफावसुली करत मोठ्या प्रमाणावर विक्री केली.

दुसरीकडे, अमेरिकेतील व्याजदर धोरण, डॉलरचा मजबूत होत असलेला दर आणि फेडरल रिझर्व्हमधील संभाव्य नेतृत्व बदलामुळे कडक आर्थिक धोरणाची शक्यता वर्तवली जात असून त्यामुळेही मौल्यवान धातूंवर दबाव वाढला आहे.

सध्या सोने-चांदीचे गुणोत्तर ४६:१ वर आले असून गेल्या दहा वर्षांची सरासरी ८०:१ इतकी आहे. इतिहास पाहता हे गुणोत्तर ५०:१ च्या खाली गेल्यानंतर चांदीत सोन्याच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात चांदी अधिक अस्थिर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तज्ज्ञांच्या मते बाजार सध्या ‘करेक्शन मोड’मध्ये असून सोने प्रति १० ग्रॅम १.४० लाख रुपये आणि चांदी प्रतिकिलो २.८० लाख रुपयांच्या आसपास स्थिरावू शकते.

गुंतवणूकदारांनी घाई न करता पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक आणि जोखीम लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. ही घसरण शेवट नसली तरी निश्चितच सतर्कतेचा इशारा देणारी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe