Health Insurance:- अचानकपणे उद्भवणारे खर्च जर बघितले तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हॉस्पिटलचा खर्च म्हणजेच आरोग्यावर होणारा खर्च याचा समावेश करावा लागेल. कारण कोणत्या वेळी कुणाला आरोग्याची समस्या उद्भवेल आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज येईल याबद्दल कुठल्याच प्रकारची शाश्वती देता येत नाही.
आपल्याला माहित आहे की हॉस्पिटलमध्ये जर ऍडमिट झाले तर प्रचंड प्रमाणात खर्च लागतो अशावेळी आपल्याकडे पैसा असेल तर ठीक होते. नाहीतर उगीचच मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
म्हणून आरोग्य विमा घेऊन ठेवणे खूप गरजेचे आहे. यामध्ये देखील आरोग्य विमा घेताना बरेच जण काही चुका करतात व या चुका तेव्हा तुम्ही विम्याच्या बाबतीत दावा दाखल करतात तेव्हा नडतात व तुमचा दावा नाकारला देखील जाऊ शकतो व तुम्हाला एक रुपया देखील मिळू शकत नाही. त्यामुळे काही चुका आरोग्य विमा घेताना टाळणे खूप गरजेचे आहे.
या चुका टाळा आणि आरोग्य विमा मिळवा
1- चुकीची माहिती देणे– बऱ्याचदा जेव्हा आपण पॉलिसी खरेदी करतो तेव्हा वय, उत्पन्न तसेच व्यवसाय इत्यादी बद्दल सत्य माहिती देणे खूप गरजेचे आहे. परंतु बऱ्याचदा यासंबंधीची चुकीची माहिती विमा कंपनीला दिली जाते.
या परिस्थितीत विमा कंपन्या अशा प्रकारचे आरोग्य विम्याचे दावे नाकारू शकते. त्यामुळे आरोग्य विमा घेताना किंवा दावा करताना तुमचं वय, उत्पन्न यासंदर्भातली योग्य आणि सत्य माहिती देणे गरजेचे असते.
2- वेळेमध्ये विमा दावा दाखल करा– विम्याचा दावा दाखल करण्याची एक निश्चित वेळ असते. त्यामुळे त्या वेळेच्या अधीन राहूनच दावा दाखल करणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेत दावा दाखल केला नाही तर तुमचा विमा दावा कंपनी नाकारू शकते.
3- तुम्हाला काही आजार असेल तर खरी माहिती कंपनीला देणे– जेव्हा आपण आरोग्य विमा घेतो किंवा आरोग्य विमा काढतो तेव्हा बऱ्याचदा आपण आपल्याला असलेल्या काही जुनाट आजारांबद्दलची माहिती देत नाहीत. त्यामुळे आपल्याला वाटते की आपला विम्याचा हप्ता वाढेल.
परंतु ही चूक नंतर खूप महागात पडू शकते. कारण यामुळे देखील विमा कंपनी तुमचा आरोग्य विम्याचा दावा नाकारू शकते. त्यामुळे तुम्हाला जर काही आजार असेल तर त्याची सत्य माहिती संबंधित विमा कंपनीला देणे गरजेचे आहे.
4- मर्यादेतच क्लेम करा व योग्य कागदपत्र पुरवा– समजा तुम्ही पॉलिसीच्या मर्यादेपेक्षा जास्त क्लेम केला तर कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. दुसरे म्हणजे दावा करताना आवश्यक कागदपत्रे तुम्ही दिली नाहीत
तरी विमा कंपनीच्या माध्यमातून तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त विम्याचा क्लेम करणे टाळावे. जेवढी आवश्यकता आहे तेवढाच विमाचा क्लेम करावा व त्यासोबत कागदपत्रांची योग्य पूर्तता करावी.
5- पॉलिसी मधील समाविष्ट गोष्टींचाच दावा करा– तुम्ही आरोग्य विमा घेतल्यानंतर त्यामध्ये कुठकुठल्या बाबी कव्हर केल्या जातील आणि कुठल्या नाहीत याची तुम्हाला माहिती असणे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे जेव्हाही तुम्ही आरोग्य विma घ्याल तेव्हा त्या पॉलिसीच्या सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विमा दावा दाखल करताना त्या पॉलिसीमध्ये ज्या गोष्टींचा समावेश नाही अशा गोष्टींसाठी दावा करू नये. अशा प्रकारचा दावा जर तुम्ही केला तर तो नाकारला जाऊ शकतो.