Home Loans : गेल्या काही वर्षांत देशाच्या आर्थिक स्थितीत अनेक बदल झाले आहेत. विशेषत: आता कामाचा भाग बनलेल्या महिलांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मालमत्ताधारक म्हणून महिलांची संख्याही वाढली आहे.
सध्या पहिले तर पुरुषांपेक्षा महिला अधिक गृहकर्ज घेताना दिसत आहेत. एका सर्वेक्षणानुसार, मालमत्ता खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या 48 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर पुरुषांची संख्या ४६ टक्के आहे. महिलांची ही संख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. बँका आणि इतर वित्तीय संस्था महिलांना स्वस्तात कर्ज तर देत आहेतच पण त्यांना करबचतीसह अनेक फायदेही मिळत आहेत. महिलांना गृहकर्जावर मिळणारे फायदे पुढील प्रमाणे…

कमी व्याजदर
बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) महिलांना मालमत्ता मालक होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे ज्या महिलांना स्वतःची मालमत्ता खरेदी करायची आहे किंवा गृहकर्जासाठी सहअर्जदार आहेत अशा महिलांना या वित्तीय संस्था पुरुषांपेक्षा कमी व्याजदरात कर्ज देत आहेत. अशा महिलांना पुरुषांच्या तुलनेत 0.05 ते 0.1 टक्के स्वस्त गृहकर्ज मिळत आहे.
कर लाभ
गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर्जाच्या मूळ रकमेवर १.५० लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते. पूर्णतः बांधलेल्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजावर कलम 24B मध्ये कमाल 2 लाख रुपयांची कर सूट दिली जाते.
मुद्रांक शुल्क
मुद्रांक शुल्क राज्यानुसार बदलते. यामध्ये महिलांनाही सूट मिळते. महाराष्ट्रात पुरुषांसाठी 6% आणि महिलांसाठी 5% मुद्रांक शुल्क आहे. पंजाबमध्ये महिलांसाठी 5% आणि पुरुषांसाठी 7% आहे. इतर राज्येही महिलांना सूट देतात.
व्याज अनुदान
अधिकाधिक महिलांना संपत्तीचे मालक बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यामध्ये व्याज अनुदानाचाही समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महिलांना कमाल 2.67 लाख रुपये व्याज अनुदान मिळते. यासाठी महिलांनी जमीनदार किंवा सहअर्जदार असणे आवश्यक आहे.
विशेष प्रसंगी विशेष ऑफर
स्वतःची मालमत्ता असल्याने आर्थिक सुरक्षिततेची भावना मिळते. वरील लाभांव्यतिरिक्त, बँका आणि वित्तीय संस्था महिलांसाठी हंगामी किंवा विशेष प्रसंगी विशेष ऑफर आणतात. याव्यतिरिक्त, महिला कर्जदार त्यांच्या गृहकर्जाशी संबंधित खर्चात बचत करू शकतात.