PNB Alert : तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांचे खाते पीएनबीमध्ये आहे आणि ते गेल्या 3 वर्षांपासून वापरले जात नाही.
पीएनबीने ग्राहकांसाठी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत बँकेने म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांत कोणताही व्यवहार झाला नाही आणि ज्यांची शिल्लक शून्य आहे, ती खाती एका महिन्यानंतर बंद केली जातील.
बँकेने हा निर्णय का घेतला?
अनेक लोक या प्रकारच्या खात्याचा गैरवापर करतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँक 30 एप्रिल 2024 रोजी या खात्यांची गणना करेल.
हे खाते बंद केले जाणार नाही
पीएनबीने आपल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, जी खाती वापरली जात नाहीत ती 1 महिन्यानंतर बंद केली जातील. तथापि, बँक डिमॅट खाती बंद करणार नाही.
त्याचवेळी, बँक सुकन्या समृद्धी योजना (SSY), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) यांसारख्या योजनांसाठी उघडलेली खाती बंद करणार नाही. याशिवाय मायनर सेव्हिंग अकाउंटही बंद केले जाणार नाही.
खाते पुन्हा कसे सक्रिय होईल?
बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खाते निष्क्रिय झाले आणि ग्राहकाला खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर त्याला बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल.
केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही जोडावी लागतील. ग्राहक त्यांच्या बँक खात्याशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी बँक शाखेशी संपर्क साधू शकतात.