Income Tax Rule:- सध्या आपण अनेक वेळा बातम्यांमध्ये वाचले असेल की आयकर विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या असून या धाडींमध्ये मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता तसेच मोठ्या प्रमाणावर सोने व इतर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे.
तेव्हा आपल्या सारख्यांच्या मनात नक्कीच प्रश्न उद्भवतो की नेमके अशा पद्धतीने घरात सापडलेले रोख रक्कम किंवा सोने आयकर विभागाकडून का जप्त करण्यात येते? किंवा आपल्याला रोख रक्कम किंवा सोने किती प्रमाणामध्ये घरात ठेवण्याची मुभा आयकर विभागाकडून देण्यात आलेली आहे.

नक्कीच यासंबंधी देखील आयकर विभागाचे काही नियम आहेत व त्या नियमांना धरूनच आपल्याला घरामध्ये अशा प्रकारचे पैसे किंवा सोने ठेवण्याची परवानगी मिळत असते. आता यामध्ये सोन्याचा विचार केला तर लग्नामध्ये किंवा इतर समारंभांमध्ये अंगावर मोठ्या प्रमाणावर सोने घातले जाते.
परंतु या बाबतीत देखील पाहिले तर लग्नामध्ये वधुच्या अंगावर किती सोन्याचे दागिने घालणे नियमानुसार योग्य आहे हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. याबाबतीत जर आपण आयकर कायद्याचा विचार केला तर एक विवाहित महिला किती सोने ठेवू शकते? याबाबतचे देखील एक माहिती समोर आलेली आहे. त्याविषयीची माहिती या लेखात घेऊ.
विवाहित स्त्री घरांमध्ये किती सोने ठेवू शकते?
भारताचा विचार केला तर भारतामध्ये सोन्याच्या खरेदी करण्यावर व त्याच्या साठवणुकीवर देखील सरकारचे काही नियम आहेत. घरामध्ये किती सोने असावे याबाबत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. या मर्यादेनुसार पाहिले तर एक विवाहित महिला कमाल पाचशे ग्राम सोने घरात ठेवू शकते.
त्या तुलनेमध्ये अविवाहित महिला 250 ग्रॅम पर्यंत सोने घरात ठेवू शकते. महिलांव्यतिरिक्त पुरुषांचा विचार केला तर एक विवाहित किंवा अविवाहित पुरुष कमाल 100 ग्रॅम सोने घरात ठेवू शकतो. या मर्यादेपर्यंत जर तुमच्याकडे सोने असेल तर तुम्हाला त्या सोन्याचा कोणताही पुरावा देण्याची गरज भासत नाही किंवा कुठलीही कागदपत्रे तुमच्याकडे कोणीही मागणार नाही.
परंतु या मर्यादेपेक्षा जर जास्त सोने तुमच्याकडे असेल तुम्हाला आयकर रिटर्नमध्ये प्रत्येक वर्षाला त्याची माहिती देणे आवश्यक आहे. परंतु जर याबाबतची माहिती तुम्ही आयकर विभागाला दिली नसेल व मर्यादेपेक्षा तुमच्याकडे जास्त सोने आढळून आल्यास आयकर विभागाच्या धाडीमध्ये ते जप्त केली जाण्याची शक्यता आहे व यामुळे अडचणी देखील निर्माण होऊ शकतात.
तसेच असे सोने तुम्ही कायदेशीर मार्गाने घेतल्याचे देखील सिद्ध करावे लागेल. अशा प्रकरणांमध्ये तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची देखील शक्यता वाढते. त्यामुळे निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा घरामध्ये जास्त सोने ठेवणे हे नियमानुसार योग्य नाही.