Agri related Business Idea:- शेती क्षेत्र व शेती क्षेत्राशी संबंधित असलेले अनेक छोटे मोठे व्यवसाय करून आपण जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातुन मोठ्या प्रमाणावर समृद्ध होऊ शकतो. कृषी क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की यामध्ये अनेक छोटे मोठे व्यवसाय येतात व असे व्यवसाय करून शेतकरी बंधू अगदी शेतीचा व्यवसाय सांभाळून खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळवू शकता.
आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण शेती व्यवसाय करतो तेव्हा शेतीमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता आपल्याला भासते. शेती व्यवसायाची निगडित किंवा आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन करून शेतकरी बंधू चांगला नफा मिळवू शकतात. आपल्याला माहित आहे की शेतीमधून कुठलाही माल जेव्हा उत्पादित होतो तेव्हा तो बाजारपेठेत पाठवण्यासाठी पोते किंवा बारदान लागत असते किंवा भाजीपाला बाजारपेठेपर्यंत तुम्हाला न्यायचा असेल तर त्याकरिता विशिष्ट प्रकारच्या बॅगा किंवा बारदानाची गरज भासते.
अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी तागापासून बनवलेले पोते किंवा बारदान बनवण्याचा व्यवसाय सुरू केला तर त्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचा नफा शेतकऱ्यांना मिळणे शक्य आहे. त्यामध्ये उदाहरण घ्यायचे झाले तर कांदा भरायचा असेल तर त्याकरिता आता मोठ्या प्रमाणावर बारदान लागते.
अशा प्रकारचा उद्योग जर स्थापन केला तर तो आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचा ठरू शकतो. यामध्ये जर कांदा साठी गोणी निर्मिती करायची असेल तर पातळ कापडाची बॅग बनवली जाते. या उलट साखर किंवा इतर धान्य भरायचे असेल तर त्याकरिता जाड कापडाची गोणी किंवा पोते वापरण्यात येते.तुम्ही या सगळ्या प्रकारानुसार बारदान बनवण्याचा व्यवसाय उभारू शकता.
कांदा गोणी किंवा बारदान बनवण्याच्या व्यवसायासाठी किती लागेल भांडवल?
कांदा गोणी किंवा बारदान तयार करण्याचा व्यवसाय तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे तीन ते पाच लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे. या व्यवसायाकरिता कच्चामाल देखील लागतो. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला पोती किंवा गोण्या नेमक्या कोणत्या पद्धतीच्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्हाला कापड लागतो व त्यासोबत सुतळीसारखा काही छोटा मोठा कच्चामाल आवश्यक असतो.
व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल तुम्ही किनाऱ्यालगतच्या राज्यांमधून मिळवू शकतात. उदाहरण घ्यायचे झाले तर पश्चिम बंगाल तसेच मुंबई व तामिळनाडू सारख्या राज्यांमधून तुम्हाला हा कच्चामाल अगदी सहजपणे उपलब्ध होतो व इंडियामार्ट सारख्या वेबसाईटचा वापर करून देखील तुम्ही हा कच्चामाल मिळवू शbकतात.
या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री व त्याची किंमत
पोते किंवा गोणी तयार करण्यासाठी कापडाची आवश्यकता असते व तो कापड कटिंग करण्याकरिता तुम्हाला कटिंग मशीनची आवश्यकता असते. तसेच हा कट केलेला कापड शिवण्यासाठी तुम्हाला शिलाई मशीन देखील लागते. कांदा गोणीचा विचार केला तर ही तुम्ही हाताने देखील शिवू शकतात. यासाठी आवश्यक असलेले यंत्रे वेगवेगळ्या क्षमतेनुसार उपलब्ध असून त्या पद्धतीने त्यांची किंमत देखील ठरत असते.
किती लागेल मनुष्यबळ?
या व्यवसायामध्ये तुम्हाला साधारणपणे दहा ते वीस मनुष्यबळाची म्हणजेच मजुरांची आवश्यकता भासते. जर तुम्ही यंत्राच्या साहाय्याने पोते किंवा बारदान बनवत असाल तर मात्र मनुष्यबळ कमी लागते.
तयार माल कुणाला विकाल?
या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही गोणी किंवा पोते किंवा बारदान तयार कराल ते तुम्ही कोणत्या ठिकाणी विकू शकतात हे शेतकरी बंधूंना वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु तरीदेखील तुम्ही बाजार समितीमधील व्यापारी तसेच शेतकरी, कारखानदार अशा प्रकारची पोती किंवा बारदान विकणारे रिटेल दुकानदारांशी संपर्क करून तुम्ही तयार केलेला माल पोच करून त्या माध्यमातून विक्री वाढवू शकता व चांगला नफा मिळवू शकता.