Pm Mudra Yojana:- केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवल्या जात असून या माध्यमातून व्यवसाय उभारण्याकरिता अनेक योजनांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात आणि अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.
अशा योजनांचा फायदा घेऊन देशातील तरुण-तरुणी स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात व त्या माध्यमातून आर्थिक स्थिरता जीवनामध्ये आणू शकतात. बऱ्याच व्यक्तींच्या डोक्यामध्ये एखाद्या व्यवसायाची प्लॅनिंग असते.

परंतु भांडवला अभावी व्यवसाय सुरू करता येणे शक्य होत नाही. तसेच बँकेच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून काहीतरी देणे गरजेचे असते व यात देखील अनेक तरुणांना समस्या निर्माण होते
व अशा परिस्थितीमध्ये कर्ज मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री मुद्रा योजना ही तुम्हाला तारणमुक्त कर्ज देते. केंद्र सरकारच्या माध्यमातून 2015 मध्ये या योजनेला सुरुवात करण्यात आलेली होती व या योजनेच्या माध्यमातून कुठल्याही हमीविना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते.
पीएम मुद्रा योजनेतून कोणत्या व्यवसायासाठी मिळते कर्ज?
यामध्ये केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बिगर कॉर्पोरेट आणि बिगर कृषी व्यवसाय सुरू करण्याकरिता मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्जाचा लाभ घेऊ शकतात.
म्हणजेच तुम्हाला कॉर्पोरेट आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करायचा असेल तर मात्र या माध्यमातून तुम्हाला कर्ज मिळत नाही. याशिवाय तुम्हाला सर्व व्यवसायांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून पन्नास हजारापासून ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळते.
मुद्रा लोनचा फायदा कोणाला मिळतो?
यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे व 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या भारतीय नागरिकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत कर्ज मिळते. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे. म्हणजेच पाच वर्षाच्या आत तुम्हाला कर्जाची परतफेड करावी लागते.
या कर्जाचा लाभ कसा मिळवू शकतात?
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला बँक तसेच मायक्रो फायनान्स कंपनी आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कर्ज दिले जाते.
या कर्जासाठी तुम्हाला कुठली कागदपत्रे लागतात?
जर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे प्रमाणपत्र गरजेचे असते व यामध्ये व्यवसायाचे नाव, व्यवसायाला सुरुवात कधी केली व त्याचा पत्ता असणे गरजेचे असते.
याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड तसेच जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बचत बँक खात्याचा तपशील तसेच बँक शाखेची माहिती, जीएसटी क्रमांक आणि उद्योग आधार क्रमांक याशिवाय पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रे देणे गरजेचे असते.तसेच व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र किंवा दुकानाचे प्रमाणपत्र देखील देणे गरजेचे असते.
या योजनेसाठी कसा कराल अर्ज?
1- सगळ्यात आधी तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे अधिकृत वेबसाईट mudra.org.in वर जावे लागेल.
2- त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल व त्यावर शिशु, किशोर आणि तरुण अशी कर्जाचे पर्याय मिळतील.
3- यामध्ये शिशू लोन अंतर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांचे कर्ज मिळते तर किशोर कर्ज अंतर्गत पाच लाख रुपये आणि तरुण कर्ज अंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज मिळते. यापैकी तुम्हाला हवा तो एक पर्याय निवडावा लागतो.
4- हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचा फार्म पेजवर मिळतो व हा फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट तुम्हाला काढावी लागते.
5- त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल व सांगितलेली सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी लागतील. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्स टॅक्स रिटर्नची प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो फॉर्म सोबत जोडावा लागेल.
6- त्यानंतर हा भरलेला फॉर्म तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत सबमिट करणे गरजेचे आहे. त्यानंतर बँक या फॉर्मची पडताळणी करेल व सर्व माहितीची पडताळणी पूर्ण केल्यानंतर बँकेकडून कर्ज मंजूर केले जाते.