Post Office Savings Schemes : मार्केटमध्ये सध्या गुंतवणुकीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. लोकं आपल्या सोयीनुसार गुंतवणूक पर्याय निवडतात, सर्वसामान्य लोकं जास्तीत-जास्त सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे भर देतात. सुरक्षित गुंतवणुकीमधला एक उत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजना.
पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त बचत योजना आहेत. यामध्ये, भरपूर व्याजदर, आयकर सूट अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या योजनांमधली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काही योजनांमध्ये मिळणारे व्याजही करमुक्त असते.
दरम्यान, आजच्या या लेखात आम्ही पोस्ट ऑफिसच्या अशाच खास योजनांबद्दल माहिती देणार आहोत, जिथे बँकांप्रमाणे आरडी देखील करता येते. तुमच्या माहितीसाठी सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 6.5 टक्के व्याज दिले जात आहे. पण या योजनेवर आयकर सवलत उपलब्ध नाही आणि नियमानुसार त्यात मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागतो.
याशिवाय, पोस्ट ऑफिसमध्ये आणखी एक चांगली योजना आहे, तिला मासिक उत्पन्न योजना म्हणतात. याला सामान्यतः पोस्ट ऑफिस एमआयएस देखील म्हणतात. सध्या या योजनेवर 7.4 टक्के व्याजदर दिले जात आहे. MIS ही 5 वर्षांची ठेव योजना आहे, ज्यावर दरमहा व्याज दिले जाते. येथ जास्तीत जास्त 9 लाख रुपये एकाच नावाने आणि 15 लाख रुपये संयुक्त नावाने जमा करता येतात. या योजनेत जमा केलेल्या पैशावर आयकर सवलत मिळत नाही आणि नियमानुसार मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागतो.
बँकेतील FD प्रमाणे, पोस्ट ऑफिसमध्ये TD म्हणजेच टाइम डिपॉझिट देखील असते. हे 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी करता येते. एका वर्षाच्या TD वर 6.9 टक्के, 2 आणि 3 वर्षाच्या TD वर 7 टक्के आणि 5 वर्षाच्या TD वर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. 5 वर्षांच्या टीडीमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवीवर आयकराच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट मिळू शकते. मात्र, व्याजावर नियमानुसार कर भरावा लागतो.
तर किसान विकास पत्रात जमा केलेले पैसे 115 महिन्यांत दुप्पट होतात. किसान विकास पत्र (KVP) मध्ये सध्या 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत जमा केलेल्या पैशावर आयकर सवलत मिळत नाही आणि नियमानुसार मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागतो.
पीपीएफवर देखील खूप चांगले व्याज दिले जात आहे. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. ही योजना 15 वर्षांची आहे, ज्यामध्ये दरवर्षी पैसे जमा करावे लागतात. या योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. आयकर कलम 80C अंतर्गत या ठेवीवर आयकर सूट मिळू शकते. याशिवाय, पीपीएफमध्ये पैसे जमा करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे योजना पूर्ण झाल्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे आयकरमुक्त आहे.
दुसरीकडे, सुकन्या समृद्धी योजना जमा केलेल्या पैशांवर आयकर सूट देते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडता येते. सध्या या योजनेत 8 टक्के व्याज मिळत आहे. ही 21 वर्षांची ठेव योजना आहे आणि मुलगी मोठी झाल्यावर संपूर्ण पैसे परत केले जातात.
आणखी एक चांगली पोस्ट ऑफिस योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे आहे. हे सामान्यतः NSC म्हणून ओळखले जाते. पोस्ट ऑफिस NSC वर सध्या 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून, आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळू शकते.
पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही शेवटची योजना आहे. ही योजना ५ वर्षांसाठी आहे. सध्या येथे ठेवलेल्या पैशावर 8.2 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत आयकर सवलती उपलब्ध आहेत. येथे जमा केलेल्या पैशावर प्राप्तिकरात सूटही मिळते आणि या योजनेचे संपूर्ण व्याज करमुक्त आहे.