समाजामध्ये जेव्हा आपण काहीतरी काम करत असतो किंवा आपल्या आयुष्यातले काहीतरी निर्णय घेतो. तेव्हा समाजातील अनेक लोक उगीचच आपल्याला नाव ठेवण्यात आणि फुकटचा सल्ला मोठ्या प्रमाणावर देत असतात.
अगदी अशीच परिस्थिती हरीओम नौटियाल या तरुणासोबत देखील घडली.हरीओम याने शहरात असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडली व तो गावी परत येऊन एखादा व्यवसाय करावा या उद्देशाने गावी परत आला.
यामुळे लोकांनी त्याला विविध प्रकारचे टोमणे मारायला सुरुवात केली.परंतु त्याने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले व दूध व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले व आज त्याचा हा दूध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झाला असून त्या माध्यमातून त्याने कोटी रुपयांची उलाढाल तर सुरू केली आहेच.
परंतु पाचशे लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. हरीओम हा मूळचा डेहराडूनचा रहिवासी असून या ठिकाणी त्याने धान्य धेनू नावाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याची यशोगाथा आपण या लेखात बघू.
अशी झाली दूध व्यवसायाला सुरुवात
जेव्हा हरीओम नोकरी सोडून गावी परत आला तेव्हा त्याला लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली व याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत दूध व्यवसाय सुरू करायचे ठरवले व दहा गाईंपासून त्याने सुरुवात केली. जसे प्रत्येकाला कुठलीही गोष्ट सुरुवात करताना अगदी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात.
तशा अडचणी हरीओमला देखील आल्या. सुरुवातीला असे झाले असे की त्याच्याकडे दुधाचे उत्पादन तर व्हायला लागले परंतु त्याला खरेदीदारच मिळत नव्हता. त्यामुळे कित्येकदा त्याला फुकट दूध वाटावे लागले. परंतु हार न मानता त्याने आपले काम सुरू ठेवले व हळूहळू त्याला स्थानिक महिला आणि इतर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळू लागला.
टप्प्याटप्प्याने यामध्ये प्रगती करत 2016 पर्यंत त्यांनी दूध संकलन केंद्र सुरू केले व याकरिता सरकारी अनुदानाचा फायदा देखील त्याला मिळाला. दूध उत्पादनामध्ये त्याने दुधाचा दर्जा चांगला राहावा यावर पूर्ण फोकस केला. याकरिता जनावरांना सेंद्रिय चारा उपलब्ध करून दिला.
तसेच दूध संकलन केंद्रामध्ये जे ग्राहक दूध द्यायचे त्यांना लॅक्टोमीटर मोफत उपलब्ध करून दिले व या प्रकारे त्याने ग्राहकांचा विश्वास जिंकला. आज जर आपण हरिओमचा हा व्यवसाय पाहिला तर तो डेहराडून आणि ऋषिकेशमध्ये दररोज 250 लिटर दुधाची विक्री करतो.
ऋषिकेश मध्ये राहणारे अनेक ग्राहक गेल्या नऊ वर्षापासून हरीओम कडून दूध खरेदी करतात. कारण ग्राहकांना ताजे आणि शुद्ध दूध उपलब्ध करून देण्यावर त्याचा फोकस आहे.
दूध व्यवसायातून आहे दोन कोटींची वार्षिक उलाढाल
हरीओमने दूध व्यवसाय इतक्या चांगल्या पद्धतीने विकसित केला आहे की तो दूध विक्री करण्यासोबतच हरी ओम मावा, आईस्क्रीम तसेच रबडी आणि फालुदा यासारखे दुधावर प्रक्रिया करून पदार्थ देखील तयार करून त्यांची विक्री करतो.
हे सगळे उत्पादने तो स्थानिक बाजारपेठेत व व्यापारी मेळ्यांमध्ये विक्री करतो. आज हरीओमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपयांची झाली असून पंधरा गावातील पाचशे लोकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेला आहे. नक्कीच हरिओम नौटीयालची यशोगाथा इतर तरुणांना देखील प्रेरणा देणारी आहे.