RBI Rule: एटीएममधून पैसे काढायला गेले आणि फाटलेली नोट आली तर काय कराल? काय आहेत त्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम?

rbi rule

RBI Rule:- बऱ्याचदा आपण बाजारामध्ये काही वस्तू खरेदी करायला जातो व काही पैसे आपल्याला दिले जातात तेव्हा त्यातील काही नोटा या फाटक्या असतात. याशिवाय आपण प्रवास करत असताना जेव्हा एखाद्या टॅक्सी किंवा रिक्षावाल्याला पैसे देतो तेव्हा भाडे देऊन उरलेले पैसे परत देताना एखादी नोट फाटकी देऊन तो निसटतो.

बरेचदा आपले हे लक्षात येत नाही व लक्षात आल्यानंतर मात्र आपल्याकडून ती नोट कोणीच घेत नाही. याशिवाय बऱ्याचदा आपण एटीएम मधून पैसे काढायला जातो व पैसे काढल्यानंतर एटीएम मधून देखील फाटक्या किंवा खराब नोटा बाहेर येतात. त्यामुळे कशा प्रसंगी काय करावे हे आपल्याला सुचत नाही.

त्यामुळे याबाबत रिझर्व बँकेचे नेमके काय नियम आहेत हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून हे नियम माहिती असल्यावर आपल्याला फाटकी नोट कुठे बदलावी आणि त्याबाबत आपले काय अधिकार आहेत? हे कळण्यास मदत होते.

 एटीएममधून फाटलेली नोट आली तर काय करावे?

1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही ज्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढायला गेलेत व त्या ठिकाणी तुम्हाला नोटा मिळाल्या त्याच बँकेला तुम्हाला त्या बदलून घेणे गरजेचे राहील.

2- एटीएम मधून पैसे काढल्यानंतर तर तुम्हाला खराब फाटलेली नोट मिळाली तर अशा नोटा घेऊन तुम्ही लगेच बँकेत जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.

3- अर्ज भरताना त्यामध्ये पैसे केव्हा काढले त्या दिवसाची तारीख, पैसे काढण्याची वेळ आणि एटीएम नेमके कोणत्या ठिकाणी आहे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये नमूद कराव्यात.

4- अर्ज भरताना त्यासोबत पैसे काढल्यानंतर एटीएम मधून मिळालेली स्लिपदेखील जोडणे गरजेचे आहे.

5- स्लीप जर तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्हाला मिळालेल्या एसएमएसच्या माध्यमातून झालेल्या व्यवहाराचा तपशील त्या ठिकाणी सादर करावा.

6- संपूर्ण प्रक्रिया करून बँकेला माहिती सादर केल्यानंतर संबंधित बँकेकडून तुम्हाला सर्व नोटा लगेच बदलून दिल्या जातात.

 रिझर्व बॅंकेचे काय आहेत नियम?

अशा प्रकारच्या नोटा बदलून देण्याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून स्पष्टपणे नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार कोणत्याही बँकेला जुन्या तसेच फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देता येत नाही. बँकांना आपल्या सर्व शाखांमध्ये ही सेवा ग्राहकांना द्यावी लागते.

 अशा प्रकारच्या नोटा कुठे बदलून दिल्या जातात?

आरबीआय विभागीय आणि सर्व सरकारी बँकांमध्ये फाटक्या नोटा तुम्हाला बदलून दिल्या जातात. त्याऐवजी जर खाजगी बँक असेल तर असे खाजगी बँकांच्या चेस्ट शाखांमध्ये देखील नोटा बदलून मिळतात. फक्त अशा प्रकारची चेस्ट शाखा रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून अधिकृत केलेली असणे गरजेचे आहे.

 जर बँकेने नोटा बदलून दिल्या नाहीत तर या संबंधीची तक्रार कुठे करता येते?

समजा फाटक्या नोटा बदलून देण्यामध्ये बँकेने नकार दिला तर अशावेळी संबंधित बँकेच्या विरोधात तुम्ही आरबीआयकडे रितसर तक्रार करू शकतात व ही तक्रार ऑनलाइन देखील करता येते. अशा प्रकरणांमध्ये आरबीआय संबंधित बँकेवर दहा हजारापर्यंत देखील दंड आकारू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe