Secured Credit Card:- क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर हा तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तुमचा क्रेडिट स्कोर जर उत्तम असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज मिळण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही.
परंतु बऱ्याचदा असे होते की आपण अगोदर घेतलेल्या कर्जाची परतफेड योग्यपद्धतीने केली नाही किंवा क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरले नाहीत तर आपला क्रेडिट स्कोर घसरतो व त्यामुळे आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा बँकेकडून कर्ज मिळणे कठीण होते.

याच पद्धतीने जर समजा तुम्हाला असुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजेच आपण जे काही सामान्य क्रेडिट कार्ड असते ते जर घ्यायचे असेल व तुमचा क्रेडिट कोड जर घसरलेला असेल किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला क्रेडिट कार्ड बँक देत नसेल
तर तुम्ही सुरक्षित क्रेडिट कार्डचा पर्याय वापरू शकतात. आता नेमका तुम्हाला प्रश्न पडला असेल की सुरक्षित क्रेडिट कार्ड नेमके काय असते व त्याचे वैशिष्ट्ये काय असतात? तर याचे उत्तर आपण या लेखात बघणार आहोत.
काय असते नेमके सुरक्षित क्रेडिट कार्ड?
समजा तुम्हाला सुरक्षित क्रेडिट कार्ड जर घ्यायचे असेल तर तुम्हाला मुदत ठेव सारखी काही सुरक्षा रक्कम बँकेमध्ये जमा करणे गरजेचे असते. कारण कमी क्रेडिट स्कोर असल्यामुळे बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा कर्ज देऊ शकत नाही.
परंतु तुम्ही जर काही सुरक्षा रक्कम बँकेत जमा केली तर तुम्हाला सिक्युर्ड पद्धतीचे क्रेडिट कार्ड बँकेच्या माध्यमातून देण्यात येते. या क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही सामान्य क्रेडिट कार्ड सारखा आरामात करू शकतात.
या क्रेडिट कार्ड वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब झालेला असेल व तुम्ही सुरक्षित क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यामध्ये याची मदत होते.
कालांतराने तुमचे हे सुरक्षित क्रेडिट कार्ड सामान्य क्रेडिट कार्ड म्हणजेच असुरक्षित क्रेडिट कार्ड होऊ शकते व तुमची क्रेडिटची लिमिट देखील वाढू शकते.
सुरक्षित क्रेडिट कार्ड वरचा लिमिट कसा ठरतो?
यामध्ये सुरक्षित क्रेडिट कार्डची जर आपण क्रेडिट लिमिट पाहिली तर तुम्ही जी काही सुरक्षा रक्कम बँकेमध्ये जमा केलेली असते त्या मूल्याच्या बरोबरीचा लिमिट तुम्हाला या कार्डवर दिला जातो. समजा तुम्ही बँकेमध्ये एक लाख रुपयाची एफडी केली असेल तर तुमचा क्रेडिट कार्डचा लिमिट देखील एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो.
विशेष म्हणजे हे कार्ड देताना बँकेच्या माध्यमातून तुमच्या क्रेडिट स्कोर तपासला जात नाही. जर तुम्ही क्रेडिट कार्ड साठी पहिल्यांदाच अर्ज केला असेल व तुमचा क्रेडिट स्कोर खराब असला तरी देखील तुम्हाला सुरक्षित क्रेडिट कार्ड बँकेकडून दिले जाते व याचा वापर करून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकतात.
यामध्ये समजा तुम्ही हे क्रेडिट कार्ड वापरले व बँकेकडून घेतलेले पैसे जमा केले नाहीत तर ते तुमच्या एफडीमधून किंवा सुरक्षा म्हणून तुम्ही जी काही रक्कम ठेवलेली असते त्यामधून तेवढे पैसे कापले जातात.
परंतु जर तुम्ही असे केले तर तुमच्या क्रेडिट स्कोरवर याचा विपरीत परिणाम म्हणजेच निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो.हे क्रेडिट कार्ड सामान्य क्रेडिट कार्डपेक्षा थोडे महाग असतात.कारण त्यामध्ये सुरक्षा तुम्हाला जमा करावे लागते.
परंतु याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर किंवा तुमच्या क्रेडिटचा इतिहास न तपासता तुम्हाला ते दिले जाते. हे क्रेडिट कार्ड अगदी सहजतेने तुम्हाला बँकेकडून मंजूर केली जाते.तसेच सामान्य क्रेडिट कार्डप्रमाणे तुम्हाला रिवार्ड पॉईंटचा फायदा देखील दिला जातो.
तसेच यामध्ये तुम्हाला अतिरिक्त कालावधीचा लाभ देखील मिळतो. हे कार्ड तुम्हाला बँक ऑफ बडोदा तसेच एसबीआय व ॲक्सिस बँक इत्यादी कडून दिले जाते.