Saving Scheme:- तुम्ही किती पैसे कमविता त्यापेक्षा तुम्ही कमवलेला पैसा कसा गुंतवता किंवा त्याची बचत कशी करता याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे भविष्यकालीन आर्थिक दृष्टिकोनातून बरेच व्यक्ती जे काही पैसे कमवतात त्यामधून थोडीफार बचत करून बचत गुंतवण्याचा प्रयत्न करतात. गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात प्रथम परतावा किती मिळेल किंवा त्यावर व्याजदर कसा राहील आणि गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहील का याचा विचार प्रकर्षाने केला जातो व त्या दृष्टिकोनातूनच गुंतवणूक केली जाते.
गुंतवणूक योजनांमध्ये शासनाच्या देखील अनेक प्रकारच्या योजना असून अशा योजना या गुंतवणूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून खूप फायद्याच्या आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण खास महिला वर्गासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या महिला सन्मान बचतपत्र योजनेची माहिती घेतली तर ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची असून महिलांनी जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर त्यांच्या गुंतवणुकीवर खूप चांगल्या प्रकारचे व्याज आणि परतावा मिळतो.
काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना?
जर आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचा विचार केला तर या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आलेली आहे. एक एप्रिल 2023 रोजी अधिकृतपणे या योजनेची लॉन्चिंग करण्यात आली. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत कोणतीही महिला बचत खाते उघडू शकते.
योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर साडेसात टक्के वार्षिक व्याज दिले जाते. महत्वाचे म्हणजे हे व्याज तिमाही आधारावर खात्यात जमा केले जाते. यामध्ये कोणतीही महिला खातेदार वार्षिक 1000 ते 2 लाख रुपये पर्यंतचे रक्कम जमा करू शकतो. या योजनेच्या विषयी लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत म्हणजेच दोन वर्षांकरिता फक्त उपलब्ध आहे.
सर्व बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनाया योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी अधिकृत केले आहे व देशातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच महिलांना महिला बचत प्रमाणपत्र योजनेचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये देखील उघडता येऊ शकते. महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे व त्यांना अधिक व्याजाचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
कोणत्याही वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड व फोटो आवश्यक आहेत. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळते. या योजनेत दोन वर्षाकरिता पैसे जमा करता येतात व योजनेच्या परिपक्वतेवर म्हणजेच मॅच्युरिटीवर दोन वर्षाचे व्याज मिळते.
दोन वर्षाकरिता दोन लाख रुपये गुंतवले तर किती पैसे मिळतील?
या योजनेत तुम्ही दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पहिल्या तीन महिन्यानंतर म्हणजेच तीमाही नंतर तुम्हाला 3750 रुपये व्याज मिळते. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी ही रक्कम पुन्हा गुंतवल्यानंतर तुम्हाला तीन हजार आठशे वीस रुपये व्याज मिळते व त्यानुसार ही योजना परिपक्व झाल्यानंतर तुमच्या दोन लाख गुंतवणुकीवर एकूण 2 लाख 32 हजार 44 रुपये तुम्हाला मिळतात. म्हणजेच एकूण दोन वर्षात दोन लाख गुंतवणुकीवर तुम्हाला 32 हजार 44 रुपयांचा फायदा होतो.
अशाप्रकारे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही महिलांसाठी खूप उपयुक्त असून दोन वर्षात चांगला व्याजाचा फायदा घेण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.