Share Market News : शुक्रवारी शेअर बाजारात अदानी समूहाला मोठा धक्का बसला. अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात समन्स बजावण्यास मंजुरी द्यावी, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल झाल्याची बातमी समोर येताच अदानी समूहातील अनेक कंपन्यांचे शेअर्स जोरात घसरले.
कथित फसवणूक आणि तब्बल 26.5 कोटी अमेरिकन डॉलरच्या लाच प्रकरणाशी संबंधित हे वृत्त असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

या नकारात्मक बातमीचा सर्वाधिक फटका बसलेल्या कंपन्यांमध्ये सिमेंट क्षेत्रातील सांघी इंडस्ट्रीजचा समावेश आहे. सांघी इंडस्ट्रीजचा शेअर 63.87 रुपयांवरून घसरत थेट 60 रुपयांच्या घरात पोहोचला.
काही वेळेस हा शेअर 60 रुपयांपेक्षाही खाली घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. याआधीच्या दिवशीही हा शेअर सुमारे 5.40 टक्क्यांनी घसरून बंद झाला होता, त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
सांघी इंडस्ट्रीजच्या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 71.80 रुपये इतकी असून, नीचांकी पातळी 50.10 रुपये आहे. सध्याच्या घसरणीमुळे हा शेअर पुन्हा एकदा नीचांकी पातळीच्या दिशेने सरकत असल्याची भीती बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कंपनीमध्ये प्रमोटर्सकडे सुमारे 75 टक्के हिस्सा असून उर्वरित 25 टक्के हिस्सा सार्वजनिक शेअरधारकांकडे आहे.
दरम्यान, अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील न्यायालयात गौतम अदानी आणि सागर अदानी यांना ई-मेलद्वारे नोटीस पाठवण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या घडामोडींचा थेट परिणाम अदानी समूहाच्या प्रतिमेवर तसेच शेअर बाजारातील विश्वासावर होत असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, सांघी इंडस्ट्रीजची बोर्ड बैठक 29 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील समाप्त तिमाही तसेच नऊ महिन्यांच्या आर्थिक निकालांवर चर्चा होणार आहे.
यासोबतच काही महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या शेअरची दिशा काय असेल, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून बाजारात मोठी चढउतार पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













