Success Story:- तरुणाई म्हटले म्हणजे प्रचंड जोश, प्रचंड प्रमाणात असलेला उत्साह आणि काहीही करण्याची मनाची प्रचंड तयारी आणि आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट उपसण्याची तयारी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आजकालचे तरुण अनेक क्षेत्रांमध्ये खूप हिरीरीने आणि उत्साहाने काम करत असून त्याला शेती क्षेत्र देखील अपवाद नाही.
बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी आता बहुसंख्य तरुण हे शेतीमध्ये नसीब आजमावत असून आपल्या वाढवडिलांच्या शेतीची पद्धतीत बदल करत शेतीचा पार चेहरा मोहराच तरुणांनी बदलवून टाकलेला आहे. विविध प्रकारच्या फळबाग, भाजीपाला पिकांची लागवड व त्याला तंत्रज्ञानाची जोड देत भरघोस उत्पादन मिळवण्याचा हातखंडा तरुणांनी मिळवला आहे.

शेती क्षेत्रामध्ये अनेक तरुणांच्या यशोगाथा आपल्याला सांगता येतील. परंतु यामध्ये राजस्थान राज्यातील जयपूर येथे राहणाऱ्या ऋतुराज शर्मा या 33 वर्ष वय असलेल्या तरुणाच्या शेतीची पद्धत पाहिली तर आश्चर्याचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही. शेतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्पोरेट स्वरूप देण्याचे महत्त्वपूर्ण काम या ऋतुराज शर्माने केलेले आहे. त्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
ऋतुराज शर्मा या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा
ऋतुराज शर्मा हा मूळचा राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असून शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रकारचे प्रयोग सातत्याने तो करत आहे. शेतीमध्ये प्रगती करत असताना या तरुणाने कोटी रुपयांची कंपनी उभी करून मोठ्या स्वरूपामध्ये शेती कशी केली जाते हे जगाला दाखवून दिले आहे. ऋतुराजने गुडगाव या ठिकाणी झेटाफार्म्स नावाची कंपनी स्थापन केली असून या कंपनीच्या माध्यमातून व्यावसायिक शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
या कंपनीचे कामाचे स्वरूप पाहिले तर ही कंपनी भाडेतत्त्वावर जमीन घेते व त्यामध्ये विविध प्रकारची फळे व भाजीपालाचे उत्पादन घेते. बी टेक आणि एमबीए च्या पदव्या मिळवल्यानंतर ऋतुराजला नोकरी मिळू शकली असती.परंतु नोकरी न करता त्याने स्टार्टअपमध्ये पडण्याचा निर्णय घेतला व झेटाफार्म ही कंपनी त्याचा तिसरा स्टार्टअप आहे.
या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर किंवा करारावर शेती घेतली जाते व किमान एका शेतकऱ्याकडून 50 एकर किंवा गटाकडून 100 एकर पर्यंत जमीन भाडे तत्वावर ही कंपनी घेत असते. या जमिनीवर शेती केली जाते. आज या कंपनीचा विस्तार पाहिला तर देशातील पंधरा राज्यांमध्ये झाला असून या राज्यातील जवळपास 20 हजार एकर जमिनीवर या कंपनीच्या माध्यमातून शेती केली जात आहे.
यामध्ये साठ पेक्षा जास्त पिके घेतली जातात. अगदी सुरुवातीला ऋतुराज शर्माने दोन एकर शेती घेऊन व्यवसायाला सुरुवात केली व हळूहळू भाडेतत्त्वावर आणि करारावर जमिनी घेतल्या व व्यवसायामध्ये वाढ केली. पहिल्या वर्षी त्याच्या कंपनीला फक्त एक लाख रुपयांचा नफा झाला होता पण नंतर त्यांनी नियोजनातून वेगाने कामाचा विस्तार केला.
या गोष्टींची काळजी घेत झेटाफार्म्सने मिळवले यश
ही कंपनी कायम पीक विविधतेवर काम करते. म्हणजे एका ठिकाणी एकाच पिकाची शेती हानीकारक असल्यामुळे विविध प्रकारची पिके वेगळ्या भागात घेतले जातात. या कंपनीचे टीम जर पाहिली तर यामध्ये ऑपरेशन्स तसंच मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रकारच्या तज्ञांचा समावेश आहे. ही कंपनी शेतीसाठी अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करते.
माती परीक्षणापासून तर शेतीसाठी आवश्यक इतर गोष्टींपर्यंत लागणारी माहिती पूर्ण टीमकडून गोळा केली जाते व त्याचा अवलंब शेतीमध्ये केला जातो. तंत्रज्ञानाचा विचार केला तर यामध्ये हवामान ॲप्स आणि क्रॉप मॉनिटरिंग सह विविध प्रकारचा डेटा चा वापर विश्लेषणासाठी केला जातो.
तसेच कंपनीच्या माध्यमातून सिंचन तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जातो. तसेच काही ठिकाणी जर पाणी कमी राहिले तर कमीत कमी पाण्यात कोणती पिके चांगली येतील याच्या नियोजनावर देखील कंपनी मोठ्या प्रमाणावर काम करते. तसेच आवश्यक संसाधनांचा योग्य वापर करून उत्पादन व नफा जास्तीत जास्त वाढवण्याकडे या कंपनीचा कल आहे. पिकांसाठी औषधे व कीटकनाशकांचा तसेच खतांचा वापर करताना व्यवस्थापनाच्या पद्धती अवलंबल्या जातात व त्यामुळे खर्च कमी होतो व शेतीमध्ये कमी रसायने देखील वापरले जातात.
झेटा फार्म्स कंपनी बद्दल ऋतुराज काय म्हणतो?
कंपनी बद्दल बोलताना ऋतुराज ने सांगितले की, या माध्यमातून शेतीला एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न केला जात असून या कंपनीच्या माध्यमातून शेतीमधून देखील अशा पद्धतीने कोटी रुपयांची कमाई केली जाऊ शकते. ज्याप्रमाणे फायनान्स किंवा आयटी क्षेत्रामध्ये लोक आवडीने आणि अभिमानाने काम करतात अगदी त्याच पद्धतीने शेतीमध्ये देखील आदराच्या भावनेने काम केले गेले पाहिजे हा प्रामुख्याने यामागचा उद्देश आहे. महत्वाचे म्हणजे येणाऱ्या 2030 या वर्षापर्यंत पन्नास हजार एकरावर शेती करण्याचे ऋतुराजचे स्वप्न असून त्या दृष्टिकोनातून तो काम करत आहे.













