Success Story :- आज जीवनातील कुठल्याही क्षेत्रात असो प्रत्येक व्यक्ती ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणहून जास्तीत जास्त आपल्याला पैसा कसा मिळेल याचा विचार करत असतो. आपल्या भारताचा विचार केला तर भारत हा कृषिप्रधान देश असून या ठिकाणी आणि सुशिक्षित आणि अशिक्षित लोक देखील आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागले आहेत व त्या माध्यमातून लाखोंची कमाई देखील करत आहेत.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण एका ठिकाणाच्या शेतकरी असलेल्या वडील आणि मुलाची कहाणी पाहिली तर यांनी देखील शेतीच्या जोरावर खूप चांगल्या प्रकारे कमाई केली आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
विविध प्रकारच्या भाजीपाला लागवडीतून लाखोत कमाई
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील सारण या परिसरामध्ये प्रामुख्याने तांदूळ, गहू तसेच मका अशी पिके शेतकरी बंधू घेत असतात. परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल दिसून येत आहे. या ठिकाणचे अनेक तरुण आता शेती व्यवसायाकडे वळले असून भाजीपाला लागवडीकडे त्यांचा मोठ्या प्रमाणावर भर आहे.
याच ठिकाणचे बच्चा यादव व त्यांचा मुलगा टूनटून हे देखील सारण या गावचे रहिवासी असून ते आता भाजीपाला लागवड करून भाजीपाला पिकवत आहेत व त्या माध्यमातूनच दररोज चांगले पैसे मिळवत आहेत. अगोदर बच्चा यादव हे शेतीमध्ये भात आणि गहू यासारखी पारंपारिक पिके घेत होते परंतु त्यामधून पुरेसे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळत नव्हते.
म्हणून त्यांचा मुलगा टुणटून यांनी दुधी भोपळा लागवडीचा सल्ला वडिलांना दिला.त्यामुळे बच्चा यादव यांनी मुलाने दिलेला सल्ला ऐकला व यूएस डब्ल्यूएस -906 हा दुधी भोपळा वाण आणला व त्याची लागवड शेतात केली. या दुधी भोपळा लागवडीतून त्यांना आता खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळत आहे. आता त्यांनी बाजारात मागणी असलेल्या अनेक प्रकारचा भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला आहे.
एक एकर शेतामध्ये त्यांच्या दुधी भोपळा लागवड केली असून त्या माध्यमातून चांगला पैसा त्यांना मिळत आहे. एका हप्त्यामध्ये व्यापारी त्यांच्या शेतामध्ये येऊन दुधी भोपळा खरेदी करतात व या माध्यमातून त्यांना तब्बल दहा हजार रुपये इतकी कमाई होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की बाजारपेठेचा अभ्यास आणि परिस्थितीनुसार जर बदल स्वीकारला तर शेती क्षेत्रामध्ये देखील आपण खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळवू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी परिस्थितीनुरूप शेतीत बदल करणे खूप गरजेचे आहे.