Sukanya Samriddhi Yojana:- समाजातील विविध घटकांकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात. कृषी क्षेत्रा असो किंवा बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी मदत असो याकरिता अनेक योजना या खूप फायदेशीर सिद्ध होत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण मुलींचे शैक्षणिक व आर्थिक भविष्य सुरक्षित रहावे याकरिता राबवण्यात येणाऱ्या योजनांचा विचार केला तर यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना ही एक लाभदायी अशी योजना आहे.
या योजनेमध्ये जर गुंतवणूक केली तर मुलींचे भविष्य आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित होईल हे मात्र निश्चित. मुलीच्या भविष्यकालीन लग्न किंवा शिक्षण तसेच इतर बाबींसाठी पैसा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

ही एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेमध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्यास या योजनेच्या परिपक्वतेनंतर चांगला परतावा मिळणे शक्य आहे. याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेतून जर तुम्हाला ही योजना पूर्ण झाल्यानंतर 27 लाख रुपयांचा परतावा हवा असेल तर नेमकी किती गुंतवणूक प्रत्येक महिन्याला करावी लागेल? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.
27 लाखाच्या परताव्यासाठी इतकी करावी लागेल बचत
सुकन्या समृद्धी योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून मुलींच्या सुरक्षित आर्थिक भविष्याकरिता ही योजना खूप महत्वपूर्ण आहे. यामध्ये दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या नावाने या योजनेमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेमध्ये कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात.
या योजनेमध्ये कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी पाहिला तर तो पंधरा वर्षे असून तुम्हाला पंधरा वर्षांकरीता त्यामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. या योजनेचा परिपक्वता अर्थात मॅच्युरिटी पिरियड 21 वर्ष आहे. साधारणपणे या योजनेमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला जर पाच हजार रुपयांचे गुंतवणूक केली तर तुम्ही एक चांगली रक्कम सुकन्या समृद्धी खात्यामध्ये जमा करू शकतात.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 8% दराने व्याज मिळते. जर आपण दर महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर आकडेवारीनुसार एका वर्षाला 60000 रुपये जमा होतात व अशाप्रकारे तुम्ही सतत 15 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुमची नऊ लाखाची गुंतवणूक जमा होते.
या जमा नऊ लाखावर आठ टक्के दराने व्याज जोडण्यात येते. या जमा रकमेच्या अनुषंगाने तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेचे जे काही कॅल्क्युलेटर आहे त्यानुसार हिशोब केला तर तुम्ही केलेल्या नऊ लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 17 लाख 93 हजार 814 रुपये इतके व्याज मिळते.
म्हणजेच या योजनेच्या परिपक्वतेवर तुम्हाला तुमची जमा गुंतवणूक आणि त्यावरील मिळणारे व्याज असे एकूण 26 लाख 93 हजार 814 म्हणजेच अंदाजे 27 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळेल. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नात देखील खर्च करू शकतात व मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता. तसेच यामध्ये केलेली गुंतवणूक ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीस पात्र ठरते.













