Sukanya Samrudhi Update:- सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये काही योजना या कृषी क्षेत्राशी निगडित आहेत तर काही समाजातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता व्यवसाय उभारणीसाठी देखील मदत करतात.
या सगळ्या योजनांच्यामध्ये जर आपण मुलींच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांचा विचार केला तर यामध्ये सुकन्या समृद्धी योजना ही खूप महत्त्वपूर्ण अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींचे शैक्षणिक भविष्य देखील उज्वल होऊ शकते अशा पद्धतीची ही योजना आहे.

खास करून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ही योजना प्रामुख्याने राबवली जात आहे. परंतु सध्या जर या योजनेसंबंधी असलेली एक महत्त्वाचे अपडेट पाहिली तर सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा नियम या योजनेसाठी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या मुलींचे या योजनेत खाते आहे अशा सर्व व्यक्तींना हा नियम माहिती असणे गरजेचे आहे.
सुकन्या समृद्धी योजनेच्या बाबतीत नवीन नियम लागू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महिलांच्या सक्षमीकरण आणि मुलींच्या उज्वल भविष्याकरिता सरकारच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना राबवली जात असून या योजनेशी संबंधित सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे व तो म्हणजे ज्या मुलींचे या योजनेअंतर्गत खाते असेल अशा मुलींना आता 31 मार्च 2024 पर्यंत खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक ठेवणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे.
समजा जर खात्यामध्ये किमान रक्कम ठेवली नसेल तर खाते इनऍक्टिव्ह म्हणजेच निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे निष्क्रिय खाते पुन्हा सुरू करण्याकरिता संबंधित खातेधारकाला दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये कमीत कमी 250 रुपये शिल्लक ठेवणे गरजेचे आहे.
तुम्हाला जर या योजनेचे खाते ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय ठेवायचे असेल तर यामध्ये एका आर्थिक वर्षात कमीत कमी 250 रुपये गुंतवणूक गरजेचे आहे. जर असे केले नाही तर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद होऊ शकते व त्याला पुन्हा सुरू करण्यासाठी खातेधारकाला प्रति वर्ष 50 रुपये इतका दंड भरावा लागू शकतो.
सुकन्या समृद्धी योजनेचे स्वरूप व मिळणारा व्याजदर
सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून सरकार ८.२ टक्के दराने व्याज देते व या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 250 ते कमाल दीड लाख रुपये जमा करता येऊ शकतात. जेव्हा मुलगी 18 वर्षाची होते तेव्हा खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम काढण्याची मुभा या माध्यमातून मिळते. म्हणजेच या पैशांमधून मुलींना पदवी किंवा उच्च शिक्षण देखील घेता येऊ शकते.