कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचे असेल तर अगोदर त्या क्षेत्राचा अनुभव तुमच्या गाठीशी असणे खूप गरजेचे असते. कारण अनुभव असल्याशिवाय तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व गोष्टी किंवा खाचखळगे समजू शकत नाही आणि तुम्हाला काम करताना खूप अडचणी निर्माण होतात. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तरी यामध्ये अनुभवाला खूप मोठे प्राधान्य दिले जाते किंवा महत्त्व देखील तितकेच आहे.
याच मुद्द्याला कृषी क्षेत्र म्हणजे शेती देखील अपवाद नाही. यामध्ये देखील तुम्हाला कामाची सवय किंवा अनुभव असणे खूप गरजेचे असते. शेतीमध्ये तर अनेक प्रकारची कामे केली जातात त्यामुळे अनुभवाशिवाय शेती ही गोष्ट शक्यच नाही असे साधारणपणे परिस्थिती असते.

परंतु काही व्यक्ती कुठलाही अनुभव नसताना देखील शेतीमध्ये येतात किंवा इतर व्यवसायात पडतात. परंतु त्या आधी ते त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळवतात व व्यवसायात पडल्यानंतर मात्र हळूहळू शिकत जातात व कालांतराने त्या माध्यमातून खूप आर्थिक नफा मिळवतात. अगदी याच पद्धतीने जर आपण पुणे जिल्ह्यात असलेल्या खेड शिवापुर येथील हर्षदा सोनार या महिलेचा प्रवास पाहिला तर तो देखील असाच प्रेरणादायी आहे.
गुलाब लागवडीतुन प्रतिमहिना 1 लाख 25 हजाराचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील खेड शिवापुर येथील हर्षदा सोनार या पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये एचआर एडमिन या महत्त्वपूर्ण पदावर नोकरीला होत्या. जेव्हा त्या नोकरी करत होत्या तेव्हा ते बऱ्याचदा फुल विक्रेत्यांकडे गुलाबाची फुले विक्रीला असल्याचे पाहायच्या व त्यांना त्या फुलांबद्दल खूप आकर्षण वाटायचे.
यासोबतच त्यांना हे फुल कशा पद्धतीने तयार होत असेल किंवा याची शेती कशी केली जाते असे अनेक प्रश्न येत असत. त्यामुळे त्यांनी सातत्याने इंटरनेटच्या मदतीने गुलाब लागवड म्हणजेच गुलाब शेतीची संपूर्ण माहिती काढायला सुरुवात केली. ही माहिती गोळा करत असताना गुलाब लागवडी बद्दलचा त्यांचा उत्साह वाढत गेला आणि 2016 साली त्यांनी गुलाब शेती करण्याचे निश्चित केले.
त्या अगोदर त्यांनी या गुलाब शेतीतील अनेक बारकावे समजून घेण्याकरिता परिसरात असलेली शिक्रापूर व तळेगाव सारख्या परिसरातील गुलाब उत्पादन घेणाऱ्या ओळखीच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पुरेशी माहिती घेतली. सगळी माहिती घेतल्यानंतर शिक्रापूर येथे वीस गुंठे आकाराचे पॉलीहाऊस त्यांनी भाड्याने घेतले व यामध्ये गुलाब लागवड केली. विशेष म्हणजे शेती कामांमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नसल्यामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबातील कुणालाच शेतीचा अनुभव न होता.
परंतु तरी देखील त्यांनी हे धाडस केले. गुलाब लागवड केल्यानंतर हळूहळू खते तसेच कीटकनाशके व गुलाबाची कटिंग,क्लिपिंग आणि बिल्डिंग सारखे सर्व कामे त्या शिकल्या व त्यानुसार त्यांनी उत्तम व्यवस्थापन करायला सुरुवात केली. गुलाबाच्या फुलाचा विचार केला तर एकदा गुलाबाचे फुल तोडले की त्या जागेवर दुसरे गुलाबाचे फुल यायला साधारणपणे 40 दिवसाचा कालावधी लागतो. यावरूनच त्यांनी सण तसेच उत्सव व बाजाराची आवक याचा व्यवस्थित अभ्यास करूनच त्यासंबंधीचे नियोजन केले. गुलाबाला लग्नसराई तसेच व्हॅलेंटाईन डे यासारख्या सीझनमध्ये सर्वात जास्त मागणी असते व त्यानुसारच ते कटिंग, बिल्डिंग तसेच क्लिपिंग व खतांचा डोस कमी जास्त करतात व त्यानुसार त्यांचे नियोजन ठरवतात.
हर्षदा ताईंचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ कसा आहे?
हर्षदा ताईंनी एका एकर मध्ये पॉलिहाऊस भाड्याने घेतले व याचे भाडे तीस हजार रुपये इतके आहे. त्यासोबतच या गुलाब शेती करिता एकूण चार कामगार असून त्यांचे पगार, खते व कीटकनाशक याच्यावरील खर्च मिळून त्यांना 85 हजार ते 90 हजार रुपये प्रत्येक महिन्याचा खर्च होतो. पॉलिहाऊस मध्ये रोज एका एकर मध्ये 800 ते बाराशे फुलांची काढणी केली जाते व या फुलांचा वीस फुले प्रति गुच्छ अशाप्रकारे गुच्छ तयार केले जातात.
बाजारामध्ये फुलांची आवक कशी आहे यावरून वीस फुलांच्या गुच्छाचा दर ठरत असतो. साधारणपणे किमान 30 रुपये तर कमाल 250 ते 300 रुपये गुच्छ याप्रमाणे दर मिळतो. तसेच गणपती उत्सवापासून व्हॅलेंटाईनच्या आठवड्यापर्यंत गुलाबाला चांगली मागणी असते व इतर कालावधीत मात्र मागणी कमी असते. त्यामुळे बाजारपेठेतील गुलाबाचे दर हे कमी जास्त होत असतात. परंतु कमी जास्त दर होत असताना देखील जर सरासरी काढली तरी त्यांना प्रति महिना 1 लाख 25 हजाराची उत्पन्न मिळते.