जेव्हा आपण कोणत्याही पर्यायांमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणूक करताना सगळ्यात आधी ज्या ठिकाणहून आपल्याला गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळेल अशा ठिकाणी किंवा अशा पर्यायांचा गुंतवणुकीसाठी आपण विचार करत असतो. अगदी याच पद्धतीचा विचार हा कुठल्याही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करण्याअगोदर गुंतवणूकदारांकडून केला जातो.
ज्या बँकेच्या माध्यमातून चांगला परतावा किंवा चांगला व्याजदर आपल्याला मिळेल अशाच ठिकाणी गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. परंतु मुदत ठेव योजनेच्या बाबतीत बघितले तर प्रत्येक बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कालावधी करिता वेगवेगळे व्याजदर ऑफर केले जातात व त्यामुळे बऱ्याचदा बँकेमध्ये एफडी करताना गोंधळ उडतो.
या अनुषंगाने आपण या लेखामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांच्या महत्वाच्या असलेल्या मुदत ठेव योजनांचा तुलनात्मक दृष्टीने माहिती घेणार आहोत. जेणेकरून एफडी करताना होणारा गोंधळ दुर होईल. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट आणि बँक ऑफ बडोदा अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिटची सुविधा देत आहेत व या माध्यमातून तुम्हाला जास्त फायदा कुठे मिळेल याची माहिती घेऊ.
एसबीआयमध्ये एफडी कराल की बँक ऑफ बडोदामध्ये? वाचा माहिती
1- एसबीआय ग्रीन टर्म डिपॉझिट योजना– एसबीआयच्या ग्रीन टर्म डिपॉझिट योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचा व्याजदराचा फायदा दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांना 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.15 टक्के दराने व्याज मिळत आहे व त्याच वेळी 2222 दिवसाच्या मुदत ठेवीवर 7.40% दराने व्याज मिळेल.
तसेच सामान्य ग्राहकांसाठी 1111 दिवस आणि 1777 दिवसांच्या मुदत ठेवीवर 6.65 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत असून 2222 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर्ड होणाऱ्या मुदत ठेवींवर 6.40 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
2- बँक ऑफ बडोदा अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट– बँक ऑफ बडोदा ग्राहकांना अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट ची सुविधा देत असून या बँकेच्या या योजनेचा उद्देश पात्रता प्राप्त पर्यावरणीय उपक्रम आणि क्षेत्रांना निधी देण्यासाठी ठेवी जमा करणे आहे.
बँक ऑफ बडोदाने पाच हजार रुपयांपासून ते दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ग्राहकांसाठी खास करून ही सुविधा आणली असून बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना दिले जाणारे व्याजदर एका वर्षाच्या कालावधीसाठी 6.75 टक्के, 18 महिन्यांसाठी 6.75%,777 दिवसांसाठी 7.17%,1111 दिवसांसाठी 6.4%,1717 दिवसांसाठी 7.17%,2201 दिवसांसाठी 6.4 टक्के इतका व्याजदर देत आहे.