Women Success Story: ‘या’ महिलेने आपत्तीतून निर्माण केली सुबत्ता! वर्षाला कमवत आहे 20 ते 25 लाख, कसं ते वाचा?

Ajay Patil
Published:
women success story

Women Success Story:- महिलांच्या बाबतीत असलेली चूल आणि मूल ही संकल्पना आता कधीच काळाच्या ओघात नष्ट झाली असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते राजकीय असो, संरक्षण, कला व सांस्कृतिक अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला आता पुरुषांच्या सोबत म्हणण्यापेक्षा एक पाऊल पुरुषांच्या पुढे कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात.

उदाहरणादाखल गेल्या काही वर्षांचा जर आपण स्पर्धा परीक्षांच्या निकालांचा ट्रॅक पाहिला तर मुलींनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. यावरून आपल्याला दिसते की आता महिला भी किसीसे कम नही ही परिस्थिती आहे.

याच प्रमाणे शेती क्षेत्रात देखील महिलांनी अत्युच्च अशी कामगिरी केली असून अशा अनेक महिला आहेत की त्यांनी वाखाणण्याजोगी प्रगती शेतीमध्ये करत आहेत.अगदी शेती संदर्भातच जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील कन्नोज जिल्ह्यातील तिरवा तालुक्यातील बुथैयान या गावच्या किरण कुमारी राजपूत यांची यशोगाथा पाहिली तर त्यांनी आपत्तीतून आर्थिक संपन्नता साधली आहे

व त्यांच्या या कामगिरीचे कौतुक चक्क गुगलने देखील केले आहे. नेमके किरण राजपूत यांनी काय केले? याबद्दलचीच माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 शेतालाच बनवले बेट आणि सुरू केले मत्स्यपालन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, किरण कुमारी राजपूत या उत्तर प्रदेश राज्यातील बुथैयान या गावचे रहिवासी असून उमरदा तालुक्यातील गुंडाहा या ठिकाणी त्यांची 23 एकर शेती आहे. परंतु या 23 एकर शेतीमध्ये नेहमी पाणी तुंबलेले असायचे.

यामुळे त्यांना शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे काय करावे हा मोठा प्रश्न समोर असताना  किरण कुमारी यांनी या शेतातील ज्या भागामध्ये हे पाणी साचलेले होते. त्या भागाचे थेट तलावात रूपांतर करण्याचा निर्णय किरण कुमारी यांनी घेतला.

पाहायला गेले तर हा निर्णय खूप अवघड आणि धाडसाचा होता. एक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचे त्यांनी संधीत रूपांतर केले व जणू काही त्या ठिकाणी एक बेटच त्यांनी तयार केले. याकरिता त्यांनी 2016 यावर्षी जलपूर योजनेचा फायदा घेतला व त्या माध्यमातून शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत मिळवली.

ही दोन लाख रुपयांची मदत आणि थोडेसे कर्ज व स्वतःची काही बचत याचा वापर केला व त्यामध्ये मत्स्यपालन व्यवसायाला सुरुवात केली. या 23 एकर जागेमध्ये तलाव उभारण्यासाठी त्यांना अकरा लाख रुपयांचा खर्च आला.

या तलावामध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर अगदी मध्यभागी बेट तयार केले व या बेटावरच शेतीयोग्य जमिनीची उभारणी करून त्या ठिकाणी आंबा, पेरू, तसेच पपई व केळी सारखे फळ पिकांची लागवड केली. म्हणजेच 23 एकरमध्ये तलाव तयार करून त्यामध्ये मच्छी पालन व त्याच 23 एकर तलावात एक एकर क्षेत्रावर बेट उभारून फळबागाची लागवड ही किमया साधणे वाटते तितके सोपे नव्हते.

त्यांनी तयार केलेले हे बेट आकर्षणाचे केंद्र बनले असून आता त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात व बोटिंगचा आनंद लुटतात. मत्स्यशेती करण्यासाठी त्यांनी चायना फिश, ग्रास कटर, सिल्वर फिश तसेच कॅटल फिश सारख्या माशांची संगोपन करायला सुरुवात केली असून मत्स्यशेती व फळांच्या उत्पादनातून ते प्रत्येक वर्षाला 20 ते 25 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत.

 गुगलने देखील केले कौतुक

किरण कुमारी राजपूत यांनी तयार केलेले हे बेट पाहण्यासाठी दूरवरून लोक त्या ठिकाणी येत आहेत व या बेटाची चर्चा आता संपूर्ण जगात देखील होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे किरण कुमारी राजपूत यांनी तयार केलेले या बेटाचे व त्यांच्या कार्याचे कौतुक गुगलने देखील केले आहे  एवढेच नाही तर वर्षभरापूर्वी त्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे.

अशा पद्धतीने जर एखाद्या महिलेने काही असाध्य गोष्ट करायची ठरवली तर ती लीलया ती साध्य करून दाखवू शकते हे किरण कुमारी राजपूत यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe