केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या लाभाच्या योजना समाजातील विविध घटकांकरिता राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. सध्या बेरोजगारीच्या प्रश्न हा भारतापुढील अत्यंत उग्र स्वरूपाचा प्रश्न असून बेरोजगारीच्या निर्मूलनाकरिता उद्योग व्यवसायांची उभारणी करण्याकरिता तरुण-तरुणींना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे आहे
व याच अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून विविध योजनांची आखणी करण्यात आलेली आहे. जर आपण अशा योजनांचा विचार केला तर यातील महत्त्वाची एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना होय. या योजनेच्या माध्यमातून लघुउद्योग उभारण्याकरिता गरजूंना मदत करण्यात येते व या योजनेच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना करते लघुउद्योग उभारण्यासाठी मदत
या योजनेची सुरुवातच मुळी लघुउद्योग सुरू करण्यासाठी करण्यात आलेली असून या माध्यमातून गरजू व्यक्तींना जर स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारायचा असेल तर कर्जाची सुविधा प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सरकारकडून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेची सुरुवात केली व या माध्यमातून बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्याच्या हेतूने दहा लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गॅरंटी अथवा तारण देण्याची गरज भासत नाही व कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क देखील द्यावे लागत नाही. घेतलेल्या कर्ज परतफेडीचा कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवण्याची मुभा या योजनेअंतर्गत दिली जाते. तसेच कुठल्याही स्वरूपाचा निश्चित व्याजदर नसल्यामुळे वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर यामध्ये आकारतात. परंतु तरी देखील विचार केला तर 10 ते 12 टक्क्यांपर्यंत किमान व्याजदर या योजनेमध्ये असतो.
योजनेच्या माध्यमातून कुठून मिळेल तुम्हाला कर्ज?
लघुउद्योग सुरू करायचा असेल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते व प्रामुख्याने मधमाशी पालन तसेच मत्स्यपालन, कुक्कुटपालन इत्यादी शेतीशी संबंधित असलेल्या उद्योगांकरिता देखील मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतले जाणे शक्य आहे.
या योजनेच्या माध्यमातून कर्ज सुविधा मिळवण्याकरिता तुम्ही पीएमएमवाय पोर्टलच्या माध्यमातून कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका तसेच सहकारी बँका तसेच ग्रामीण बँका व इतर कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांकडून देखील कर्ज मिळू शकते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि लागणारी पात्रता
या योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. यामध्ये जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर कर्ज देणारी कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर www.udyamimitra.in संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराचे वय 24 ते सत्तर वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार आयडी यासारखा केवायसी पुरावा असणे देखील गरजेचे आहे.
अशा पद्धतीने पंतप्रधान मुद्रा योजना ही खूप महत्त्वाची योजना असून या योजनेच्या मदतीने तुम्ही उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.