Joint Home Loan:- घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा खूप मोठा आधार मिळतो. विविध बँकांच्या माध्यमातून आता ताबडतोब होमलोन अर्थात गृहकर्जाची सुविधा देण्यात येत असल्यामुळे आता घराचे स्वप्न पूर्ण करता येणे सहजासहजी शक्य झाले आहे.
परंतु बऱ्याचदा जेव्हा आपण घर घ्यायचा विचार करतो व त्यासाठी गृहकर्जाकरिता बँकेत अर्ज करतो तेव्हा बऱ्याचदा बँक सहजासहजी होमलोन देत नाही. याकरिता जर तुम्ही संयुक्तपणे म्हणजेच एकट्याने अर्ज न करता एकापेक्षा दोन व्यक्ती मिळून जर गृहकर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकते.
संयुक्त गृह कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे देखील मिळतात. संयुक्त गृह कर्जामध्ये तुम्ही तुमची पत्नी तसेच बहीण आणि आई यांचा देखील समावेश करू शकतात. दुसरे म्हणजे जर तुम्ही एखाद्या महिलेसोबत संयुक्त होम लोन करिता अर्ज केला तर तुम्हाला व्याजदरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये सूट दिली जाते.
संयुक्त गृह कर्जासाठी कराल अर्ज तर ताबडतोब मिळेल कर्ज
बऱ्याचदा आपण एकटे कर्ज घेण्यासाठी अर्ज करतो व आपला क्रेडिट स्कोर मुळे किंवा कमी पगार, इतर समस्यांमुळे कर्ज बँकांकडून मंजूर केले जात नाही. परंतु जर तुम्ही संयुक्त कर्ज घेतले तर यामध्ये याकरता तुमच्या सोबत आणखी एक व्यक्ती जोडला जातो
व सिबिल सारख्या इतर गोष्टींचा प्रभाव कमी होतो व तुम्हाला सहजासहजी कर्ज मिळू शकते. तसेच संयुक्त कर्जासाठी अर्ज केलेल्या सोबतच्या व्यक्तीची क्षमता चांगली असेल तर तुम्हाला कर्ज पटकन मिळते.
करात देखील मिळते सवलत
संयुक्तपणे होमलोन घेतल्यामुळे तुम्हाला करात देखील भरपूर प्रमाणात फायदा मिळतो. संयुक्त होमलोनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दोन्ही अर्जदार करावर वेगवेगळ्या पद्धतीचे कर लाभ घेऊ शकतात. परंतु याकरता मात्र दोन्ही अर्जदार हे मालमत्तेचे मालक असणे बंधनकारक आहे.
संयुक्त होम लोनमध्ये महिला अर्जदार असेल तर मिळतात जास्तीचे फायदे
महिला अर्जदारांसोबत जर तुम्ही संयुक्त होमलोन घेतले तर तुम्हाला व्याजदरात काही सूट मिळू शकते. समजा तुम्हाला जर व्याजदर 8% द्यावा लागत असेल तर महिला अर्जदाराला त्यामध्ये कमीत कमी पाच बेसिक पॉईंटची सूट मिळते. महिला अर्जदारासह कर्जाकरिता अर्ज केल्यास तुम्हाला 7.5% इतका व्याजदर द्यावा लागतो.
जास्त प्रमाणात मिळू शकते कर्ज
जर एखाद्या व्यक्तीने कर्जासाठी व्यक्तिगत अर्ज केला तर त्याला त्याच्या उत्पन्नाच्या आधारे कर्ज मिळते. परंतु संयुक्त कर्जामध्ये दोन्ही व्यक्तींचे एकूण उत्पन्नाच्या आधारे कर्ज दिले जाते.
त्यामुळे साहजिकच कर्जाची रक्कम अधिक मिळू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर पती-पत्नी एकत्र सह अर्जदार बनले तर दोघेही मिळून कर वाचवू शकतात व अगदी सहजपणे घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात. तसेच व्याजावर देखील सूट मिळते.