आजच्या काळात तंत्रज्ञानाने आपले आयुष्य इतके सुलभ केले आहे की काही मिनिटांत कर्ज मिळवणेही शक्य झाले आहे. ‘इन्स्टंट लोन अॅप’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अॅप्सद्वारे फक्त काही क्लिकमध्ये हजारो रुपये तुमच्या खात्यात जमा होतात. पण हीच सोय पुढे जाऊन तुमच्यासाठी एका भीषण दुःस्वप्नात रूपांतरित होऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे का?

सुरुवातीला सगळं काही अगदी सुरळीत वाटतं. फारसे कागदपत्र लागणार नाहीत, तपासणीही नाही, फक्त मोबाईल नंबर, ओटीपी, आणि काही अनुमती दिल्या की कर्ज तुमच्या खात्यात. पण हीच ‘अनुमती’ तुमचा फोन, गॅलरी, संपर्क, कॉल लॉग, मेसेजेस आणि अगदी तुमचा वैयक्तिक डेटा देखील या अॅप्सच्या हातात देते.
हे अॅप्स तुमच्या खाजगी माहितीचा असा वापर करतात की वेळेवर परतफेड न झाल्यास तुम्हाला, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना फोन करून त्रास दिला जातो. बेकायदेशीर धमक्या, मानसिक छळ आणि सामाजिक लाज आणणारे मेसेज हे अनेक पीडितांनी अनुभवलेले वास्तव आहे.
‘अशी’ होते फसवणूक
कर्ज देताना हे अॅप्स जास्तीत जास्त ‘सोपे’ वाटावेत यासाठी लपवलेल्या अटी आणि नियम ठेवतात. व्याजदर खूपच जास्त असतो आणि उशिरा भरपाई, प्रक्रिया शुल्क, फाईन यामुळे तुमच्यावरचं आर्थिक ओझं वाढत जातं. काही लोक या जाळ्यात अडकून एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेत राहतात आणि अखेरीस कर्जाच्या दलदलीत बुडतात.
या अॅप्समध्ये ‘कर्ज फसवणूक’ इतकी प्रगत आहे की अनेकदा ते तुम्हाला कर्ज देण्याआधीच प्रोसेसिंग फी मागतात. त्यामुळे जर एखादा अॅप तुमच्याकडून कर्ज देण्याआधी पैसे मागत असेल, तर सावध व्हा. तो अॅप खोटा असण्याची शक्यता खूप जास्त आहे.
अनेक खोट्या अॅप्समध्ये व्याकरणाच्या चुका असतात, यांचं इंटरफेस खराब असतो आणि त्यांच्याकडे कार्यालयाचा पत्ता किंवा ग्राहकसेवा क्रमांकही नसतो. अशा अॅप्सना प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरून सहजपणे ओळखता येतं. ते नोंदणीकृत नसतात आणि त्यांच्याबाबतचे रिव्ह्यू बघितले तर अनेक लोकांनी फसवणुकीची तक्रार केली असेल.
‘इथे’ करा तक्रार
जर तुम्ही यापैकी कोणत्याही अॅपमधून कर्ज घेतलं आणि फसवणुकीचा बळी ठरलात, तर https://sachet.rbi.org.in/ या आरबीआयच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार करता येते. या व्यतिरिक्त, सायबर क्राइम पोर्टलवरही तक्रार नोंदवता येते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही कर्ज घेण्यापूर्वी ती संस्था RBI किंवा SEBI नोंदणीकृत आहे का, याची खात्री करा आणि एकदा का फसवणूक झाली, तर गप्प न बसता कायदेशीर मार्ग निवडा.