वय वाढत जातं तसं आपल्या चेहऱ्यावरची त्वचाही बदलायला लागते. सुरकुत्या, डाग, आणि विशेषतः फ्रिकल्स म्हणजेच चेहऱ्यावर उमटणारे लहान तपकिरी डाग, हे अनेकांना खटकतात. ही डागं काहीवेळा आपला आत्मविश्वासही कमी करतात, आणि आपण मग वेगवेगळ्या ब्युटी क्रीम्स, ट्रीटमेंट्स आणि पार्लर उपचारांकडे वळतो. पण या सर्व गोष्टी फक्त खिशालाच भारी पडतात, आणि परिणाम काही खरे वाटत नाहीत. पण जर तुम्हाला एखादा असा उपाय सापडला, जो फक्त ₹5 मध्ये मिळेल आणि 7 दिवसातच फ्रिकल्स कमी करेल, तर?

घरच्या घरी बनवा फेसपॅक
असाच एक साधा पण प्रभावी उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर दशमेश राव यांनी त्यांच्या व्हिडिओत एक घरगुती फेसपॅक शेअर केला आहे, जो त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ सात दिवसांत चेहऱ्यावरील फ्रिकल्स कमी करतो. विशेष म्हणजे, या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज मिळतात, आणि त्यासाठी तुमचं बजेट फक्त ₹5 इतकंच असेल.
या नैसर्गिक उपचारासाठी लागणारी सामग्री म्हणजे बटाटे, कोरफडीचं जेल, थोडीशी हळद आणि पाणी. सगळ्यात आधी दोन बटाटे सोलून त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून चांगली पेस्ट करायची. ही पेस्ट गाळून त्याचा रस एका भांड्यात गोळा करायचा आणि 10 मिनिटं तसेच ठेवायचं, जेणेकरून त्यातील स्टार्च खाली बसू शकेल. नंतर त्या साचलेल्या स्टार्चमध्ये एक चिमूट हळद, एक चमचा कोरफडीचं जेल आणि व्हिटॅमिन-ई कॅप्सूलचा रस घालून सर्व घटक व्यवस्थित मिसळायचे.
पॅक वापरण्याची पद्धत
हा पॅक वापरण्याची योग्य वेळ म्हणजे रात्रीची, झोपण्याआधी हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचे आणि सकाळी उठून कोमट पाण्याने धुवून टाकायचे. सात दिवस नियमित वापरल्यास त्वचेवरील डाग म्हणजेच फ्रिकल्स कमी होतील, असा दावा करण्यात येतोय.
या उपायात वापरलेले घटक नैसर्गिक आणि सौम्य आहेत. बटाट्याचे स्टार्च त्वचेवरचा टोन उजळवतो, कोरफड त्वचेला थंडावा आणि पोषण देते, हळद जंतुनाशक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी भरलेली असते, तर व्हिटॅमिन-ई त्वचेला दुरुस्त करण्यात मदत करतं.