वर्षांपासून ट्रेनने प्रवास करताय, पण 90% महिलांना माहिती नसतात त्यांना मिळणारे अधिकार! भारतीय रेल्वे महिलांना देते ‘या’ खास सुविधा

रेल्वेच्या प्रवासात महिलांना सुरक्षितता, सन्मान आणि स्वातंत्र्य मिळावं, यासाठी भारतीय रेल्वे काही खास अधिकार आणि नियम देते. पण दुर्दैवाने, याची माहिती अजूनही अनेक महिलांना नसते. दररोज लाखो महिला ट्रेनने प्रवास करत असताना त्यांना मिळणाऱ्या या अधिकारांमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होऊ शकतो. म्हणूनच, प्रत्येक महिलेनं या अधिकारांची माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

तिकीट नसेल तर…

सर्वप्रथम, जर कधी अशा परिस्थितीत यावं लागलं की तुमच्याकडे तिकीट नाही, तरीही प्रवास सुरू झाला आहे तर घाबरण्याचं कारण नाही. इतर प्रवाशांप्रमाणे महिलेला तिकीट नसल्यामुळे तात्काळ ट्रेनमधून उतरवण्याचा अधिकार रेल्वेला नाही. महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे. अशा वेळी रेल्वे कर्मचारी तिला तिकीट काढण्यासाठी मदत करतात, पण तिच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.

सीट बदलण्याचा अधिकार

 

तसंच, ट्रेनमध्ये बसलेली सीट बदलण्याचा अधिकारही महिलांना आहे. जर कोणत्याही कारणाने त्यांना त्यांच्या जागेवर अस्वस्थ वाटत असेल मग ते आजूबाजूच्या प्रवाशांमुळे असो वा इतर काही त्रासामुळे त्या आपली जागा बदलू शकतात. यासाठी टीसीशी संवाद साधावा लागतो आणि शक्य असेल तिथे पर्याय दिला जातो.

राखीव कोच

 

महिलांसाठी राखीव कोच ही आणखी एक मोठी सुविधा आहे. यात एक महत्त्वाचा नियम आहे की या डब्यात कोणताही पुरुष, अगदी नात्याने साथ असलेला जरी असला तरी, प्रवास करू शकत नाही. जर एखादी महिला 12 वर्षांखालील मुलासोबत प्रवास करत असेल, तर ती त्या मुलाला आपल्यासोबत घेऊन महिला कोचमध्ये बसू शकते. मात्र, त्यापेक्षा मोठा मुलगा किंवा पुरुष कुटुंबीयासोबत घेऊन या डब्यात बसणं नियमबाह्य ठरतं.

 

रेल्वे हेल्पलाइन नंबर

अशा परिस्थितीत जर एखाद्या पुरुषाने नियम मोडून महिला कोचमध्ये प्रवेश केला, तर इतर महिला प्रवाशांनी तात्काळ रेल्वे हेल्पलाइन नंबर 139 वर कॉल करावा. ही सेवा 24×7 उपलब्ध असून कोणतीही तक्रार, धोक्याची माहिती किंवा मदतीची विनंती दिली असता रेल्वे कर्मचारी त्वरित मदतीसाठी पोहोचतात.

या सगळ्या नियमांचा हेतू एकच आहे, महिलांना रेल्वे प्रवासात सुरक्षित, सन्माननीय आणि निर्भय वाटावं. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल, तेव्हा या अधिकारांची माहिती लक्षात ठेवा आणि गरज पडल्यास त्यांचा योग्य वापर करा.