स्वित्झर्लंडपेक्षा सुंदर आणि दुबईपेक्षाही स्वस्त! ‘हा’ मुस्लिम देश बनतोय भारतीय प्रवाशांचा नवीन टूरिस्ट हॉटस्पॉट, बजेट ऐकून तुम्हीही कराल ट्रीपचा प्लॅन

Published on -

कधी कधी प्रवासाचं खरं सौंदर्य हे महागड्या पर्यटनस्थळांपेक्षा अशा ठिकाणी सापडतं, जिथे खर्च कमी असतो पण अनुभव अनमोल मिळतो. असंच एक ठिकाण म्हणजे कझाकस्तान. एक मुस्लिम देश जो आपल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यामुळे स्वित्झर्लंडलाही लाजवतो, आणि भारतीय पर्यटकांसाठी अगदी खिशाला परवडणारा पर्याय ठरतो.

कझाकस्तान

कझाकस्तानचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात थोडा गोंधळ निर्माण होतो. हा देश कुठे आहे, कसा आहे, आणि तिथे जायचं तरी का? पण एकदा का तुम्ही अल्माटीच्या थंडगार हवेत श्वास घेतला, तिथल्या सरोवरच्या निळ्याशार पाण्याकडे पाहिलं, किंवा अस्तानाच्या प्रकाशमय रस्त्यांवर चालत गेलात, की मग या देशाचं आकर्षण तुमच्या मनात घर करून राहतं. स्वित्झर्लंडमध्ये मिळणारं सौंदर्य आणि शांतता, तेही काही पटांनी कमी खर्चात ही कल्पनाच अनेक पर्यटकांना भुरळ घालते.

भारतातून कझाकस्तानला जाणंही काही अवघड नाही. दिल्लीहून अल्माटीला थेट फ्लाइट्स उपलब्ध असून, ऑफ-सीझनमध्ये राउंड-ट्रिप तिकीट 23,000 ते 25,000 रुपयांदरम्यान मिळतं. आणि विशेष म्हणजे, ही उड्डाणं अवघ्या 2.5 तासांची असतात, म्हणजे भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासारखंच!

वाहतूक, राहणे आणि जेवणाचा खर्च

निवासाच्या बाबतीतही कझाकस्तान तुमचं बजेट बिघडू देत नाही. दररोज फक्त 1,000 ते 2,000 रुपयांमध्ये तुम्हाला चांगल्या वसतिगृहांपासून ते बजेट हॉटेल्सपर्यंत अनेक पर्याय मिळतात. इबिस आणि हॉलिडे इनसारखी लोकप्रिय हॉटेल्स चार रात्रींसाठी फक्त 26,000 ते 32,000 रुपयांत उपलब्ध असतात.

जेवणाबाबत सांगायचं झालं तर, तुम्ही अगदी समाधानकारकपणे आणि तृप्तपणे फक्त 500 ते 700 रुपयांत दिवसभर खाऊ शकता. बेशबरमक आणि क्युरडक हे स्थानिक पदार्थ नुसते स्वस्त नाहीत, तर तुमच्या चवीलाही नवी जाणीव देतात. शिवाय, भारतीय चवीनुसार काही हॉटेल्समध्ये इंटरनॅशनल जेवणाचेही चांगले पर्याय आहे.

वाहतुकीचे दरही अतिशय वाजवी आहेत. लोकल बस, टॅक्सी आणि रेल्वे सेवा खूपच स्वस्त असून, तुम्ही दररोज 50 ते 100 रुपयांत सहज प्रवास करू शकता. यांडेक्स गोसारखी अ‍ॅप्समुळे प्रवास अजून सोपा होतो. प्रवास थोडा स्वतंत्रपणे करायचा असेल तर 5,000 ते 6,000 रुपयांत कारही भाड्याने घेता येते.

एकंदरीत, 40,000 ते 45,000 रुपयांत तुम्ही कझाकस्तानमध्ये आठवड्याभराचा एकदम झक्कास प्रवास करू शकता, ज्यात विमानप्रवास, निवास, जेवण, आणि पर्यटन स्थळांना भेट देणं सगळं समाविष्ट असतं. जोडीने प्रवास केला तर हा खर्च आणखी कमी होतो. टूर पॅकेजेससुद्धा केवळ 78,000 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

आकर्षक स्थळे

अल्माटी हे पर्यटकांचं आवडतं शहर असून बिग अल्माटी लेक, झेंकोव्ह कॅथेड्रल, मेड्यू स्केटिंग रिंक आणि शिम्बुलक स्की रिसॉर्टसारख्या ठिकाणांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. दुसरीकडे, अस्ताना कझाकस्तानची राजधानी ही शहरं आधुनिक वास्तुकलेचं आणि युरोपियन अनुभवाचं उत्तम उदाहरण आहे. बायटेरेक टॉवर, खान शातिर मॉल आणि चमचमीत रस्ते यामुळे इथं फिरणं ही एक आनंददायी गोष्ट होते.

कझाकस्तान हे केवळ स्वस्त नाही, तर व्हिसा-मुक्त देखील आहे. म्हणजेच भारतीय नागरिकांसाठी 14 दिवसांचा मोकळा प्रवेश. या सुविधेमुळे हे ठिकाण आणखी सोयीचं ठरतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!