आयुष्यात एकदा तरी जावं ‘असं’ हिल स्टेशन, येथील निसर्गाचं रूप पाहून तुम्ही नैनितालला विसराल!

मसूरी हे नाव घेताच मनात थंडगार वाऱ्याचा झुळूक, हिरवळीने नटलेले पर्वत आणि धुक्याने वेढलेली रस्ते डोळ्यांपुढे उभे राहतात. उत्तराखंडमधील हे निसर्गसंपन्न ठिकाण केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील पर्यटकांसाठीही एक स्वप्नवत पर्यटनस्थळ बनलं आहे. म्हणूनच, तिला “पर्वतांची राणी” म्हटलं जातं. पण हा दर्जा का मिळाला? आणि नैनीतालपेक्षाही ही जागा अधिक आकर्षक कशी आहे? चला जाणून घेऊया.

मसूरीचं वैशिष्ट्य

मसूरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं सौंदर्य. सर्वत्र हिरवळ, निळसर पर्वत, आकाशाशी जणू बोलणारी मोठी झाडे आणि वर्षभर आल्हाददायक हवामान. इथं केवळ निसर्ग नाही, तर इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाची विविधता पाहायला मिळते. पर्यटकांना केवळ प्रसिद्ध बाजारपेठा आणि सहलीची ठिकाणं नव्हे, तर काही अनोख्या, शांत आणि ऐतिहासिक जागाही इथे आकर्षित करतात.

लखामंडल हे असंच एक खास ठिकाण आहे, जे मसूरीपासून सुमारे 50-60 किमी अंतरावर आहे. असं मानलं जातं की महाभारतातील पांडवांनी हे स्थळ वसवलं होतं आणि याच ठिकाणी त्यांना जाळण्याचा कट आखण्यात आला होता. पौराणिक कथांनी वेढलेलं हे ठिकाण आज अनेकांच्या श्रद्धेचा आणि कुतूहलाचा विषय आहे.

धनौल्टी

त्याचप्रमाणे, धनौल्टी हे मसूरीपासून अगदी जवळ असलेलं आणखी एक सुंदर हिल स्टेशन आहे. घनदाट देवदार आणि ओकच्या जंगलांनी वेढलेलं हे ठिकाण, निसर्गप्रेमी आणि शांततेच्या शोधात असलेल्या प्रवाशांसाठी आदर्श आहे. येथे तुम्हाला निसर्गाची शांतता अनुभवता येते.

चक्राता

चक्राता हे देहरादून जिल्ह्यातील एक दुर्गम पण अप्रतिम ठिकाण आहे, जे मसूरीजवळच आहे. इथे भारताच्या विविध भागातून पर्यटक येतात. चक्राताचं हवामान, पर्वतरांगांचं दृश्य आणि लष्करी वारसामुळे हे ठिकाण वेगळं ठरतं.

मसूरीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, इथं वर्षभर देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी असते. ब्रिटिश काळात वसवलेलं हे ठिकाण अजूनही त्याच्या इंग्रजी वास्तुकलेच्या खुणा टिकवून आहे. त्यामुळेच मसूरी नुसते एक पर्यटनस्थळ नसून, अनुभवण्यासारखी जागा आहे.