आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेकदा अशा गोष्टींचा अनुभव घेतो ज्या आपल्या डोळ्यासमोर असतात, पण त्यांचे महत्त्व लक्षात येत नाही. अगदी याचप्रमाणे एक फळ आहे जे आपल्या आजूबाजूलाच नेहमी दिसते, पण आपण त्याच्या खऱ्या मूल्याकडे दुर्लक्ष करतो. ते फळ म्हणजे केळी. हो, साधी दिसणारी, परवडणारी आणि सहज उपलब्ध असलेली ही केळी, आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक अमूल्य खजिना मानली जाते.

फळांच्या किंमती वाढलेल्या असतानाही, केळी अजूनही सामान्य माणसाच्या आवाक्यातली आहे. बाजारात सफरचंद, संत्री, द्राक्षे यांसारखी फळे बऱ्याच वेळा महाग असतात, पण केळी मात्र आजही 40 ते 50 रुपयांत एक डझन मिळते. म्हणजे सरासरी एका केळीची किंमत 3 ते 4 रुपयांपेक्षा जास्त नसते. यामुळेच ती जगातील सर्वात स्वस्त फळांपैकी एक मानली जाते. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हे फळ लोकप्रिय आहे आणि सर्व स्तरातील लोकांच्या आहाराचा भाग आहे.
केळीमधील पौष्टिक घटक
पण केवळ स्वस्त असल्यामुळेच केळीची महती नाही. आरोग्यासाठीही ती तितकीच उपयुक्त आहे. केळीत भरपूर प्रमाणात पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C आणि फायबर असते. यामुळेच ती त्वरित ऊर्जा देणारे अन्न म्हणून ओळखली जाते. खेळाडू, लहान मुले, वृद्ध सर्व वयोगटातील लोक केळी आवडीने खातात. त्यात पचनास मदत करणारे घटक असतात, म्हणून ती हलकी आणि पचायला सोपी मानली जाते.
केळीचा उपयोग केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही. ती स्मूदीमध्ये, सॅलडमध्ये, केक किंवा हलवामध्येही वापरली जाते. विशेष म्हणजे उपवासाच्या दिवशीसुद्धा ती पथ्यकर मानली जाते. भारतातील अनेक परंपरांमध्ये केळीला धार्मिक महत्त्वही आहे.
‘या’ देशांत केळी प्रमुख आहार
जगभरातील अनेक देशांमध्ये केळीचा मुख्य आहार म्हणून वापर होतो. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया यांसारख्या खंडांत केळी ही एक पौष्टिक आणि किफायतशीर पर्याय मानली जाते. त्यामुळे आपण म्हणू शकतो की, हे फळ केवळ आपल्या खिशालाच परवडणारे नाही, तर आपल्या आरोग्यालाही अत्यंत लाभदायक आहे.