घर खरेदी करताना किंवा कुठे राहायचे याचा निर्णय घेताना आपल्यापैकी बरेच जण किंमत, लोकेशन, शाळा, हॉस्पिटल्स, ट्रान्सपोर्ट याकडे लक्ष देतो. मात्र एक बाब अशी आहे, जी फार कमी लोक गांभीर्याने घेतात, ती म्हणजे वास्तुशास्त्र. भारतीय संस्कृतीत वास्तुशास्त्राला घराच्या शांती, समृद्धी आणि आरोग्याशी जोडले जाते. काही घरं दिसायला छान असली, तरी त्यांचा वास्तु दोष असल्यास तिथे राहणाऱ्यांचे जीवन सतत अडथळ्यांनी भरलेले राहू शकते. त्यामुळे घर घेताना काही गोष्टींचा विचार नक्कीच करावा.

घराची जमीन
सर्वात पहिले लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे घराची जमीन कोणत्या प्रकारची आहे. वास्तुनुसार, चौरस किंवा आयताकृती आकाराची जमीन सर्वात शुभ मानली जाते. ही घरे स्थैर्य, धनप्राप्ती आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानली जातात. मात्र याच्या उलट, त्रिकोणी, हिऱ्याच्या आकाराची किंवा पाच कोपऱ्यांची जमीन घर बांधण्यासाठी अत्यंत अशुभ मानली जाते. अशा प्रकारच्या जमिनीवर घर बांधले की रहिवाशांना मानसिक अस्थिरता, आर्थिक नुकसान आणि वैयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागते.
जमिनीत कोणताही कोपरा कमी-जास्त असल्यास, त्या घरात कायम काही ना काही अडचणी राहतात. काही घरांमध्ये उत्तर-पूर्व किंवा दक्षिण-पश्चिम कोपरे अति वाढलेले किंवा कापलेले असतात. अशा स्थितीत कुटुंबात मतभेद, आजारपण, अपयश या गोष्टी सुरू होतात. त्यामुळे जमीन खरेदी करताना ती सम, समांतर आणि सर्व कोपरे पूर्ण असलेली असावी याची खात्री करणे आवश्यक आहे.
घराबाहेरचे वातावरण
घराबाहेरचे वातावरण देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. वास्तुशास्त्र सांगते की घराजवळ कोणत्याही मंदिराची सावली घरावर पडू नये. मंदिर हे पूज्य स्थान असले तरी त्याची छाया घरावर पडल्यास ती वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक परिणाम करणारी मानली जाते. त्याचप्रमाणे, रुग्णालये, श्मशान, मोठे कारखाने ही ठिकाणं जिथे सतत आजार, मृत्यू किंवा गोंधळाचे वातावरण असते, ती देखील घरापासून किमान 80 फूट अंतरावर असावीत. या गोष्टी दूर ठेवल्यास घराच्या वातावरणात शांती टिकते.
घर खरेदी करताना अजून एक गोष्ट टाळावी, ती म्हणजे कोपऱ्याची जमीन किंवा अशा भूखंडाचा तुकडा ज्याचा समोरचा भाग खूपच लहान असतो. अशी घरे अनेक वेळा मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये अडचणीत येतात, शिवाय आर्थिक स्थैर्य टिकत नाही.
त्यामुळे घर निवडताना, जर तुम्ही या वास्तुशास्त्रातील मूलभूत गोष्टी लक्षात घेतल्या, तर ते घर तुमच्या आयुष्यात समाधान आणि स्थैर्य घेऊन येईल.