जन्मकुंडलीतील ग्रह आणि राशी केवळ ज्योतिषशास्त्राचा भाग नाहीत, तर त्या आपल्या आयुष्यावर खोल परिणाम करत असतात. आपल्या राशीनुसार योग्य इष्टदेवाची आराधना केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणी कमी होतात, मनःशांती आणि यश मिळतं, असं मानलं जातं. या लेखात आपण प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह कोणता आहे, त्यानुसार कोणत्या देवतेची पूजा करावी यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मेष राशी

मंगळ या राशीचा स्वामी ग्रह असून त्याला सेनापती मानले जाते. मेष राशीच्या व्यक्तींनी हनुमानाची पूजा केल्यास शौर्य, आत्मविश्वास, आणि मंगळदोषापासून संरक्षण मिळते.
वृषभ रास
वृषभ राशीवर शुक्र ग्रह राज्य करतो. जीवनात ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखसमृद्धी वाढवण्यासाठी लक्ष्मीमातेची नियमित पूजा फलदायी ठरते. शुक्र मजबूत झाल्यास संबंधांमध्ये प्रेम आणि आर्थिक प्रगती होते.
मिथुन रास
मिथुन राशीचे कारक बुध ग्रह असल्याने या राशीच्या लोकांनी बुधवारी गणपतीची पूजा करावी. बुधाच्या कृपेमुळे संभाषणकौशल्य, बुद्धिमत्ता आणि व्यवसायात यश प्राप्त होतं.
कर्क रास
चंद्र ग्रह कारक असलेल्या कर्क राशीच्या लोकांनी सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करत शिवाची पूजा करावी. यामुळे मानसिक शांती, घरगुती सौहार्द आणि आरोग्य लाभतो.
सिंह रास
सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे. आत्मविश्वास, नेतृत्वशक्ती आणि आरोग्यासाठी सूर्याची आराधना करावी. सकाळी सूर्यनमस्कार आणि अर्घ्य देणं फायदेशीर ठरतं.
कन्या रास
कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे बुधवारी गणेश पूजन आणि हिरव्या वस्तूंचं दान लाभदायक ठरतं. गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास बुधाचे दोष कमी होतात.
तुळ रास
तुळ राशीही शुक्रप्रभावित आहे. स्त्रीदेवता विशेषतः लक्ष्मी किंवा दुर्गा मातेची आराधना केल्यास नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
वृश्चिक रास
मंगळ कारक असल्याने वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानाची भक्ती करावी. विशेषतः मंगळवारी बुंदीचा भोग अर्पण करून पूजा केल्यास आत्मबल वाढते.
धनु रास
धनु राशीवर गुरु बृहस्पती ग्रह राज्य करतो. यासाठी गुरुवारी विष्णूची पूजा आणि पिवळ्या वस्तूंचं दान करावं. बृहस्पती बळकट झाल्यास करिअर आणि विवाहात शुभ परिणाम मिळतात.
मकर रास
मकर राशीचा स्वामी शनि असल्याने शनिवारी शनि महाराजांची पूजा, काळ्या वस्तूंचं दान, आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. न्याय, संयम आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी हे आवश्यक आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनीही शनिवारी काळे तीळ दान करावेत आणि पिंपळ वृक्षाची पूजा करावी. यामुळे आयुष्यात स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि समृद्धी प्राप्त होते.
मीन रास
मीन राशीचा स्वामी गुरु आहे. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्यास विवाह, संतान, आणि आर्थिक समस्यांवर सकारात्मक परिणाम होतो.