Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे राजकीय नेते आणि राजकीय पक्ष आता एकही क्षण वाया घालवण्याच्या मूडमध्ये नाहीत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट होते, आता मात्र अवकाळी थांबला असून उन्हाचे कडक चटके अंगाची लाही-लाही करत आहेत. अशातच हवामान खात्याने यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार असे भाकीत वर्तवले आहे. उन्हाळा तापदायक ठरतो की नाही हे तर येणारा काळ सांगणार आहे, मात्र राजकीय वातावरण आत्तापासूनच तापले आहे.
कारण की, लोकसभेनंतर लगेचच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. यामुळे, महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापणे स्वाभाविक आहे. मात्र नगरचे राजकीय वातावरण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत काहीसे अधिक तापलेले आहे. कारण म्हणजे, जिल्ह्यात आगामी काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील होणार आहेत. दरम्यान, या साऱ्या घडामोडी पाहता राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. मात्र, यानिमित्ताने नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जिल्ह्यात विखे विरुद्ध सारे, असे चित्र तयार होत आहे. तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा जिल्ह्यात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बोलबाला होता तेव्हा विखे यांच्या विरोधात सर्वजण उभे राहत असत. सर्वत्र त्यांचा कडाडून विरोध होत असे. कोणतीही निवडणूक आली की, विखे विरुद्ध सारे असे चित्र तयार होत.
विखे यांच्या विरोधकांचे नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्याच हातात असे. मध्यंतरी विखे कुटुंबियांनी शिवबंधन बांधले होते, त्यांनी शिवसेनेशी सोयरीक केली होती. मात्र, या काळातही विखे कुटुंबीय विरुद्ध सारे अस पाहायला मिळाल होत. आता विखे कुटुंबीय भाजपमध्ये आहे आणि येथेही तशीच परिस्थिती तयार होत आहे. याउलट परिस्थिती विखे कुटुंबीयांसाठी अजून खडतर बनली आहे. कारण की आता विखे यांचा विरोध स्वपक्षातून म्हणजेच भाजपामधून सर्वाधिक होत आहे. भाजपामधून आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा खोलला आहे. खरे तर, राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, नगर दक्षिणचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे लोकसभेच्या उमेदवारीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
जोपर्यंत भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली नव्हती तोवर विखे पाटील यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असे वाटत होते. परंतु भाजपाने आपल्या पहिल्या यादीत अनेक केंद्रीय मंत्र्यांना तिकीट दिलेले नाही. यामुळे डॉक्टर सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याबाबत त्यांना देखील शाश्वती राहिलेली नाहीये. अशातच आता स्वपक्षातील नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात हल्ला चढवला जात असल्याने त्यांना याचा सामना करावा कसं हे सुचत नाहीये. नुकत्याच दोन दिवसापूर्वी युवा नेते विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा विखे यांच्या विरोधात होता आणि यावेळी त्यांनी त्यांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीना शासकीय निधी देतांना अडसर आणला जात असल्याचा, दुजाभाव होत असल्याचा आरोप केला होता.
खरेतर कोल्हे आणि विखे यांच्यातला वाद हा काही दोन दिवसांपूर्वीचा नाहीये. हा वाद तेव्हापासून विकोपाला गेला आहे जेव्हा विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांचा विधानसभेत पराभव झाला. त्यांनी त्यांच्या मातोश्रीचा पराभव हा विखे यांच्यामुळेच झाला असा आरोपही केला होता. या राजकीय शत्रुत्वातूनच कोल्हे व थोरात यांनी एकत्र येत विखे यांच्या हातातून गणेश सहकारी साखर कारखाना मोठ्या हिसकावून घेतला. या आधीच राहुरीतील तनपुरे हा साखर कारखाना देखील विखे यांच्या हातातून निसटला होता. वास्तविक गणेश कारखान्यात आधी विवेक कोल्हे यांचे आजोबा शंकरराव कोल्हे व राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्यातही वर्चस्वाची लढाई होत असे. पण या लढाईत वेळोवेळी समजोते होत असत.
यामुळे विवेक आणि विखे यांच्यातही असेच काही घडेल का ? हे पाहणे विशेष खास राहणार आहे. मात्र, हे समजोते होतील तेव्हा होतील त्याआधी या दोघांमधला वाद अधिक तीव्र होत आहे. खरेतर सध्या महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र संभाजी राजे यांचे महानाट्य आयोजित केले आहे. या ‘महानाट्या’च्या कार्यक्रमात विवेक कोल्हे यांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोल्हे यांनी ‘जिल्ह्याला लागलेला कॅन्सर हटवण्यासाठी लंके यांना पुढाकार घ्यावा’, असे म्हणतं त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. दुसरीकडे आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण मधून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
वेळोवेळी त्यांनी विविध व्यासपीठांवरून त्यांची ही मनातली इच्छा ओठांवर आणली आहे. आमदार निलेश लंके हे देखील नगर दक्षिणमधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे या दोघांची निवडणूक लढवण्याची तयारी आता लपलेली नाही. मध्यंतरी लंके यांनी शिव स्वराज्य यात्रा काढली होती. आता निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महानाट्याला विखे यांच्या विरोधकांची प्रचंड साथ लाभत आहे. विखे विरोधक निलेश लंके यांच्या कार्यक्रमाला सातत्याने हजेरी लावत आहेत. महानाट्याला सुद्धा विखे विरोधकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. आमदार राम शिंदे देखील या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी यावेळी लंके यांच्यावर स्तुतीसुमने उधळलीत.
दिल्ली दरबारी विखे यांचे वाढते वजन
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचं बक्षीस, नजराणा म्हणून त्यांना नगर दक्षिणची उमेदवारी मिळाली. मोदी मॅजिक आणि विखे कुटुंबियांची जिल्ह्यातील पकड यामुळे सुजय विखे हे खासदार बनलेत. सध्या ते जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. मात्र विखे कुटुंबीयांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आणि भाजपाची मोठी क्षती झाली. या पिता-पुत्रांच्या प्रवेशानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक उमेदवारांचा पराभव झाला. यामुळे पराभूत उमेदवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मात्र या तक्रारीचा फायदा विखे यांनाच झाला. त्यांचे दिल्ली दरबारी दिवसेंदिवस वजन वाढत आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वात विखे यांचा बोलबाला आहे हे सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे.
अधूनमधून त्यांची दिल्ली स्वारी सुरूच राहते. यातून ते पक्षातील आपले स्थान अधिक बळकट करू पाहत आहेत. केंद्रीय नेतृत्व देखील राज्यातील मराठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहते आणि नेहमीच त्यांच्यावर मेहरबान राहते. मात्र नगर भाजपातील निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते त्यांच्यावर नाराज आहेत. पण, या नाराजीला ते किंमत देत नाहीत हे देखील तेवढेच खरे आहे. दुसरीकडे विवेक कोल्हे यांच्या आरोपाला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिरीयसली घेतलेले नसल्याचे पाहायला मिळाले आहे. दुसरीकडे विखे यांच्या विरोधात असलेल्या आमदार मोनिका रांजळे यांनी सध्या तरी त्यांच्यासमवेत जुळवून घेतले आहे. शिवाजी कर्डीले यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी बसवले असल्याने त्यांचे विखे विरोधी सुर आता बऱ्याच प्रमाणात नरम झाले आहेत.
प्रकृती अस्वास्थ्याने आमदार बबनराव पाचपुते या वादापासून काहीसे लांब आहेत. माजी आमदार वैभव पिचड व बाळासाहेब मुरकुटे यांच्या हातातून विविध सत्तास्थाने हिसकावली गेल्याने ते विखेविरोधात जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. एकंदरीत सध्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असून विखे विरुद्ध सारे असे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मात्र या विरोधकांना विखे पुरून उरतात की विरोधक त्यांचा राजकीय कार्यक्रम करतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. पण, भाजपा हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे, या पक्षात अंतर्गत सुरू असलेले शीतयुद्ध कधीच महायुद्धापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील या परिस्थितीवर देवेंद्र फडणवीस स्वतः हस्तक्षेप करून काही तोडगा काढतात का? हे देखील पाहण्यासारखे राहील.