Ahmednagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत विखे पाटील यांच्यासहित भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला. मात्र आता या पराभवाचा वचपा करण्यासाठी सुजय विखे पाटील सज्ज झाले आहेत.
ते विधानसभा निवडणुकीत संगमनेर मधून निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आले आहे. अशातच त्यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आज डॉक्टर सुजय विखे हे वांबोरी येथे वांबोरी चारी प्रकल्प टप्पा 2 चे भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खा. निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. या कार्यक्रमावेळी बोलताना माजी खासदार विखे यांनी, ‘निवडणुकीत ज्या लोकांनी माझ्या विरोधात मतदान केलं ते लोक देखील काम करावं तर सुजय विखेंनचं कराव असं म्हणत आहेत.
पण, सध्या फक्त भाषणे सुरु आहेत. ऐ..ऐ.. अन् चालू द्या. योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला, योग्य पेशेंट मिळाले. आता सर्वांनी आनंदाने पुढे जाऊ,’ अशी खोचक अन बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना विखे पाटील यांनी पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तर मी तुम्हाला शब्द देतो की मुळा धरणामध्ये पाच टीएमसी पाणी जरी उरलं तरीही वांबोरीसाठी चालत राहील अशी ग्वाही वांबुरी येथील नागरिकांना दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात वांबोरीसाठी अनेक विकासाचे कामे होणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तसेच त्यांनी, मी सांगितलेली कामे तुम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीने करून दाखवाव असं आव्हान खासदार निलेश लंके यांना दिले आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लंके आणि सुजय विखे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.
निवडणुकीच्या काळात लंके आणि विखे यांच्यातील संघर्ष टोकावर पोहोचला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील या दोन्ही उभय नेत्यांमधील संघर्ष आणखी टोकाला पोहोचणार आहे. याची सुरुवात आतापासूनचं झाली आहे.