Ahmednagar Politics : आमचा एकही आमदार शरद पवार गटात जाणार नाही – तटकरे यांची गॅरंटी

Published on -

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा प्रचार करत मते मिळवली. मात्र सहानुभूती एकदाच मिळते. लोकदेखील एका विषयावर एकदाच मते देतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चित्र बदललेले दिसेल. लोक अजित पवारांमागे उभे राहतील.

या वेळी सहानुभूती आम्हाला मिळेल, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. अजित पवारांसोबत येण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही काहीजण संपर्कात आहेत. अजित पवारांना सोडून एकही आमदार शरद पवार गटात जाणार नाही. अशी गॅरंटी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

नगर येथे आले त्या वेळी ते बोलत होते. यावेळी तटकरे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला, ते म्हणाले की, आमदार रोहित पवारांना २०१९ मध्ये एका खासदारामार्फत भाजप नेतृत्वाशी संपर्क करून पुण्यातून उमेदवारी हवी होती. मात्र त्यांना ती नाकारली गेली.

ठाकरे सरकारमध्ये त्यांना संधी न मिळाल्याने ते राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर उमेदवारी करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. अशी टीका तटकरे यांनी केली.

नुकतेच शरद पवारांनी पक्षाचा वर्धापनदिन नगरमध्ये साजरा केला. त्यापाठोपाठ लगेच अजित पवार गटाकडूनही नगरमधूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगर दौऱ्याची तारीख अगोदर ठरलेली होती. तारीख मागे-पुढे झाली. असे सांगत खा.तटकरे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा प्रचार करत मते मिळवली.

मात्र सहानुभूती एकदाच मिळते. आम्हाला लोकसभा निवडणुकीत चार जागा मिळाल्या. विधानसभा मात्र निवडणुकीतील जागावाटपाबाबत पंतप्रधान मोदींच्या शपथविधीवेळी आमच्या तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांमध्ये चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या, तसेच इतर मतदारसंघांतील पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहे.

महायुतीमध्ये सोबत काम करायचे असल्याने त्या ठिकाणीही मजबूत पक्षसंघटन करणार असल्याचे देखील यावेळी तटकरे म्हणाले. यावेळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, आमदार संग्राम जगताप, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe