Ahmednagar Politics : येत्या २७ जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार असून यात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्यासाठी जोर वाढत आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली. त्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली आहे. येत्या आठ दिवसांत विस्तार होण्याची शक्यता आहे. अशी तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
ते म्हणाले की,लोकसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण करून असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत. त्यामुळे महायुतीला यश मिळून शकले नाही.
कांदा, सोयाबीनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. विरोधकांना सहानुभूती मिळाली. सहानुभती एकदा मिळते, पुन्हा पुन्हा मिळत नाही. विधानसभेला तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. लोकसभेला कमी जागा मिळाल्या. विधानसभेला वाटाघाटीत जास्त जागांची मागणी केली जाईल, असे तटकरे म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार संग्राम जगताप यांना संधी देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला ३१ हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे कार्यकर्त्यांनी मागणी करणे काही गैर नाही. त्यांच्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यात येतील, असेही तटकरे म्हणाले.
दरम्यान महायुती सरकारमधील शिंदे गट आणि अजितदादा गट हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे निर्माण झालेले नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी १५ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. हा खांदेपालट करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यात आ.जगताप यांच्याबाबत केलेली कार्यकर्त्यांनी मागणी यामुळे या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे नगरकरांचे विशेष लक्ष लागले आहे.