Ahmednagar Politics : जिल्हयाच्या राजकारणात आतापर्यत विखे परिवाराने सुदर्शन चक्र फिरविले की भले भले पराभूत होत. यंदाच्या जिल्हयातील लोकसभेच्या ऐतिहासिक निवडणूकांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे नव्हे तर मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शनचक्र फिरले असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.खासदार नीेलेश लंके यांनी मंगळवारी मा. मंत्री बाळासाहेब विखे यांची भेट घेत त्यांनी लोकसभा निवडणूकीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
लंके म्हणाले, जिल्हयाच्या राजकारणात स्व. बाळासाहेब विखे यांचे सुदर्शनचक्र फिरले की भले भले उमेदवार पराभूत होत. त्यांची त्या काळात जिल्हा विकास आघाडी असे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मात्र नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांची विकास आघाडी मात्र दिसूनच आली नाही. कारण ज्या कारणासाठी विकास आघाडी निर्माण केली ते सगळेच विखे यांच्या कळपात होते. समोरच्या उमेदवाराच्या विरोधात असलेल्यांना एकत्र करून मातब्बराला पराभूत करणे हा डाव त्यामुळे असफल झाल्याचे लंके यांनी सांगत यापुढील काळात मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच हातात नगर जिल्हयाची सुत्रे राहतील, ते कधीही सुडाचे राजकारण करणार नाही. थोरात कुटूंबाचा तो वारसा आहे. माझ्या विजयामध्ये मा. मंत्री थोरात यांचा सिंहाचा वाटा असल्याचे लंके यांची स्पष्ट केले.
याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, सौ.प्रभावतीताई घोगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, अरुण पा.कडू, शंकरराव पा. खेमनर, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, अमर कतारी, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह काँग्रेस पक्षाचे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की, महाभारतात कौरव आणि पांडवांच्या युद्धात श्रीकृष्णाने अत्यंत मोलाची भूमिका बजावली तशीच भूमिका आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विजयात बजावली आहे. माझ्या विजयाचे खरे किंगमेकर आमदार थोरात हे आहेत. मी अत्यंत सामान्य कार्यकर्ता आहे.परंतु संघर्षातून पुढे आलो आहे.ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब, आमदार बाळासाहेब थोरात यांचा विश्वास आणि जनतेची साथ यामुळे बलाढ्य शक्तीचा पराभव करण्यात यश मिळाले आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी अनेक प्रकार केले. धमक्या दिल्या, गुन्हे दाखल केले, नागरिकांच्या बोटाला बाहेर शाई लावण्याचा प्रयत्न केला .परंतु असे करूनही जनतेने त्यांना साफ नाकारले.
आमदार बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा अत्यंत निष्ठावंत आणि प्रामाणिक असून त्यांच्या मोलाच्या मदतीने हा विजय साकारला आहे. आगामी काळामध्ये जिल्ह्यात सर्वांना बरोबर घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेत महाविकास आघाडीच्या विजयासाठी सर्वांनी काम करायचे आहे.
आमदार थोरात म्हणाले की, नगर दक्षिणची लढाई ही श्रीमंत विरुद्ध गरीबाची होती. नीलेश लंके सामान्य परिवारातील असून संघर्षातून पुढे आले आहे. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांची लोकप्रियता मोठी होती. त्यांच्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दडपशाहीचा वापर सुरू केला. जिल्ह्यात त्यांनी सत्तेचा गैरवापर करून संगमनेर पारनेरसह सर्वत्र दहशत निर्माण केली आहे.सत्तेचा वापर हा सामान्यांच्या विकासाऐवजी ते जिरवा – जिरवीचे राजकारण करून दडपशाही निर्माण करत आहे.
संपत्ती, सत्ता, असतानाही आघोरी दहशत वापरामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे. या उलट जीवाला जीव देणारी माणसे लंके आणि निर्माण केली आहे. लंके हे अभ्यास असून त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. दिल्लीतही त्यांनी आपले कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवावा असा आशावाद व्यक्त करताना जिल्ह्यामध्ये समविचारी लोकांना एकत्र घेऊन येणारी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था लढवू असेही ते म्हणाले.
मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, देशात महागाई बेरोजगारी व अस्थिरता वाढली असून एकाधिकारशाही निर्माण करू पाहणाऱ्या भाजपाला महाराष्ट्राने रोखले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात आठ पैकी सहा व अहमदनगर मध्ये दोन्ही जागा जनतेने मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीला दिल्या असल्याचे ते म्हणाले.यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आधी फेटा थोरात साहेबांना
नगर दक्षिणची निवडणुक अत्यंत अटीतटीची व संघर्षाची होती. या निवडणुकीत आमदार थोरात हे भक्कम पाठीशी उभे राहिले. त्यांनी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने त्यांनी फेटा बांधल्याशिवाय आपण फेटा बांधणार नाही. हा पण मी केला होता. विजय झाल्यानंतर मी कुठेही फेटा बांधला नाही. थोरात साहेबांनी फेटा बांधावा तरच मी फेटा बांधील असा आग्रह केल्यानंतर आमदार थोरात यांनी सर्वांच्या आग्रहास्तव फेटा बांधला व त्यानंतरच खा. नीलेश लंके यांनी फेटा बांधला. यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
साहेबांच्या कष्टाचे चीज झाले
पक्ष फुटला, चिन्ह गेल्यानंतर वयाच्या ८४ व्या वर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पायाला भिंगरी लावून मविआचा प्रचार केला. राज्यात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या असून नगर दक्षिणची जागा मोठ्या फरकाने जिंकल्याने खासदार पवार साहेब यांच्या कष्टाचे चीज झाले असल्याचे आमदार थोरात म्हणाले.
आमदार थोरात यांची निष्ठावंत यंत्रणा
राज्यातील अभ्यासू, शांत ,संयमी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे. तालुक्यातील प्रत्येक माणसाला जपताना या नेतृत्वाने जीवाभावाची माणसे निर्माण केली आहे. लई यंत्रणा असतील परंतु निष्ठावंत आणि प्रामाणिक यंत्रणा म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यंत्रणेचा राज्यात नक्कीच गौरव आहे अशा शब्दात खासदार नीलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.