Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. 12 मार्चला भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर करणार असे संकेत आहेत. अशा परिस्थितीत, आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवार फायनल करून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भारतीय जनता पार्टीने नुकतीच आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश असून महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव या यादीत नाहीये. विशेष म्हणजे ही यादी जाहीर करताना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अनेक केंद्रीय मंत्र्यांना देखील तिकीट नाकारले आहे.
यामुळे भाजपाची जेव्हा महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हा कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभेची जागा ही महायुती मधून भाजपालाच्या वाट्याला जाणार असे चित्र आहे. सध्या या जागेवर भाजपाचे डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभेसाठी देखील ते इच्छुक आहेत आणि यासाठी त्यांनी जनसंपर्क देखील वाढवण्यास सुरुवात केली आहे.
खरंतर डॉक्टर सुजय विखे पाटील काँग्रेसमध्ये होते. मात्र मागील लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नगर दक्षिण या जागेवरून लोकसभेची निवडणूक लढवली आणि ही निवडणूक त्यांनी विक्रमी मत मिळवत जिंकली. मागच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. आता ते पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाकडून अद्याप त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जाहीर करण्यात आलेले नाही.
मात्र भाजपाकडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नसल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक विद्यमान खासदारांविरुद्ध नगर दक्षिण मधून कोणता उमेदवार उभा करावा? याची चाचपणी करत आहेत. महाविकास आघाडीमधून नगर दक्षिणच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून उमेदवार उभा केला जाणार आहे. मात्र विरोधी पक्षातून विखे यांच्या विरोधात अजूनही प्रबळ उमेदवार दिसत नाहीये.
परंतु खासदार विखे पाटील यांचा विरोध स्वपक्षातूनच अधिक होत आहे. भाजपाकडून आमदार राम शिंदे यांनी देखील नगर दक्षिण मधून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.नगर दक्षिणची जागा ही गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. 2019 आधी या जागेवरून भाजपाच्या दिलीप गांधींनी सलग तीन विजय मिळवले आहेत. आता दिलीप गांधी हयात नाहीत. तसेच 2019 मध्ये डॉक्टर सुजय विखे यांनी जोरदार कामगिरी करत येथून विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी मतदारसंघात चांगला जनसंपर्क देखील तयार केला आहे.
शासनाच्या योजना त्यांनी प्रभावीपणे जनसामान्यांमध्ये पोहोचवल्या आहेत. मध्यंतरी त्यांनी मतदारसंघात चणाडाळ आणि साखर वाटपाचा कार्यक्रम हाती घेऊन मतपेरणीला सुरुवात देखील केली होती. जोपर्यंत राष्ट्रवादीत उभी फूट पडली नव्हती तोवर या जागेवरून निलेश लंके यांना भाजपा विरोधात उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि निलेश लंके यांनी अजितदादा यांच्या गटात समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. यामुळे निलेश लंके यांचे नाव मागे पडले. परंतु निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. नुकतेच त्यांनी नगर शहरात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य देखील आयोजित केले होते. या निमित्ताने त्यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले आहेत. मात्र, नगर दक्षिणची ही जागा भाजपाच्या वाटेला असल्याने महायुती मधून त्यांना या जागेसाठी तिकीट मिळणे अशक्य आहे. यामुळे निलेश लंके यांना नगर दक्षिण मधून उमेदवारी करायची असेल तर वेगळी वाट धरावी लागणार आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून आमदार निलेश लंके पुन्हा एकदा माघारी परतत हाती तुतारी घेणार अशा चर्चा सुरू आहेत.
मात्र याबाबत सार काही अजूनही गुलदस्त्यातच आहे. यामुळे महाविकास आघाडी कडून या जागेवर कोणता उमेदवार जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. एकंदरीत महाविकास आघाडीकडे नगर दक्षिण साठी उमेदवारांचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजपामध्ये सुजय विखे यांच्याशिवाय दुसरा पर्याय अजून तरी दिसत नाहीये. पक्षांतर्गत डॉक्टर सुजय विखे यांचाकडाडून विरोध सुरू आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या महाराष्ट्र राज्य शासनात महसूल मंत्री म्हणून काम पाहत आहेत.
विशेष बाब अशी की राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चांगली जवळीक तयार झाली आहे. बीजेपीचे केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे राज्यातील मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून पाहत आहे. यामुळे विखे-पिता पुत्र यांचा दिल्ली दरबारी असणारा रुतबा पाहता पुन्हा एकदा विखे कुटुंबीय सुजय विखे यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणू शकतात असे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी महाविकास आघाडी कडून या जागेवर कोणता उमेदवार जाहीर केला जातो यावरच खासदार सुजय विखे यांच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
दुसरीकडे सुजय विखे यांना पक्षांतर्गत आमदार राम शिंदे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी जोरदार आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे विवेक कोल्हे आणि आमदार राम शिंदे यांनी निलेश लंके यांच्या व्यासपीठावर अनेकदा हजेरी देखील लावली आहे. यामुळे या जागेवरून पुन्हा एकदा तिकीट मिळवताना डॉक्टर सुजय विखे यांची दमछाक होणार आहे. पण, तरीही केंद्रीय नेतृत्वाशी असणारा विखे यांचा दांडगा संपर्क त्यांच्या कामी येण्याची शक्यता अधिक आहे. परंतु याबाबत जेव्हा भाजपाच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हाच योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे.