मतदारसंघातील स्थानिक विकास निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार करण्याची वेळ अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या आमदारांवर आली आहे ! खुद्द पवार त्यामुळे नाराज असल्याची माहिती मिळत असून याबाबत चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत आमदारांची बैठक बोलावली असल्याचे समजते.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनी बंडखोरी करून जुलै महिन्यात सत्ताधाऱ्यांसमवेत हातमिळवणी केली आणि सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या घटनेला आता चार महिने उलटून गेले आहेत.
मात्र, अद्यापही पवार गट सत्ताधाऱ्यांसमवेत जुळवून घेऊ शकलेला नाही. पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा केंद्रातील भाजपच्या नेत्यांशी संवाद असला तरी राज्यातील सत्तेत फारसे समाधानकारक चित्र नसल्याचे बोलले जाते.
पवार गट महायुतीत आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसे रूचलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांना जागोजागी चाप लावला जात असल्याची चर्चा प्रशासनात होत आहे.
पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिवसेना अस्वस्थ आहे. राष्ट्रवादी सोबत आल्याने आमची मंत्रीपदे त्यांच्या वाट्याला गेल्याची जाहीर वाच्यता शिवसेनेचे आमदार करत असतात. त्यामुळेच शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदे देण्यावरून टाळाटाळ चालवली होती.
पवार आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या त्यावरूनच सुरू झाल्या. त्याचा फटका राष्ट्रवादीच्या आमदारांना बसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या आमदारांनी पवार यांच्याकडे तक्रारी सुरू केल्या आहेत.
आपण अर्थमंत्री असतानाही सत्तेत स्थानिक विकास निधी वाटपात अन्याय होत आहे आणि सत्तेत सहभागी झाल्यानंतरही सन्मान मिळत नसेल तर काय उपयोग? आताच असे असेल, तर महायुती म्हणून एकत्र निवडणुका कशा लढणार? असे प्रश्न आमदार पक्षात उपस्थित करत असल्याची माहिती मिळते. काहींचा तर पुन्हा शरद पवार गटाकडे कल वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अजितदादांची कोंडी झाली असून त्यामुळेच ते सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.
पवार गेले दहा दिवस डेंग्यूने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हते. या काळात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र, दोन दिवसांपूर्वी ते अचानक दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले.
त्यावेळी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही होते. यावेळी पवार यांनी शाहांकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचे समजते. शाह यांनी मात्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपच्या ध्येयधोरणांनुसार वागण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी तुम्ही मौन पाळले होते, ते योग्य नव्हते तसेच जातीनिहाय जनगणनेची तुमच्या पक्षाची मागणीही भाजपच्या धोरणाच्या विपरीत असल्याचे शाह यांनी त्यांना सुनावल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते.
आश्वासन पूर्ण न झाल्याने अजितदादा नाराज –रोहित पवार
अजितदादा व बंडखोर आमदारांना भाजपने जी आश्वासने दिली होती. ती पूर्ण न झाल्याने ही मंडळी नाराज आहेत. अजितदादांच्या चेहऱ्याकडे पाहिले, तरी ते नाराज असल्याचे लक्षात येते. भाजपला खोटी आश्वासने देण्याची सवय आहे. येत्या लोकसभेपर्यंत या लोकांना वापरून घेतले जाईल आणि नंतर सोडून दिले जाईल. भाजपला लोकनेते पसंत नसतात. त्यामुळे अजितदादांसारख्या नेत्याबाबतीतही तेच सुरू झाले आहे. अशा बड्या नेत्यांची ताकद आणि महत्त्व भाजप हळूहळू कमी करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.